निवडणुकीच्या तोंडावर सरकारची सर्वात मोठी कांदा खरेदी
महाराष्ट्रातून ४५ हजार मेट्रिक टन कांदा तर गुजरात मधून पाच हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार
नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. देशात कांद्याची समस्या निर्माण होऊ नये वा खूप भाव वाढल्यास स्वस्त दरात कांदा मिळावा यासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून ही खरेदी करण्यात येते. आतापर्यंतच्या दरवर्षी होणाऱ्या खरेदीपेक्षा सर्वात मोठी खरेदी नाफेड करणार आहे. यात महाराष्ट्रातून ४५ हजार मेट्रिक टन कांदा तर गुजरात मधून पाच हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून या खरेदीला सुरुवात होणार आहे. याचा लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा सत्ताधाऱ्यांना मिळू शकतो. मात्र आचारसंहिता लागू असताना एवढा मोठा निर्णय घेतल्याने तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
आपत्तकालीन पुरवठ्याअंतर्गत दरवर्षी १३ हजार ५०० मेट्रीक टन पर्यंतचा कांदा आतापर्यंत खरेदी करण्यात आला आहे. पण यावेळी विक्रमी ५० हजार मेट्रीक टन कांद्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये ४५ हजार मेट्रीक टन कांदा महाराष्ट्रातून तर ५ हजार मेट्रीक टन कांदा गुजरातमधून खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे याचा परिणाम अप्रत्यक्षपणे लोकसभा निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे कदाचित याबाबतीत तक्रार करण्यात आली तर येत्या काळात हा निर्णय निवडणूक आयोग आपेक्ष करत हा निर्णय मागे घेऊ शकतो.