Pune News : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील लौकी गावचे सुपुत्र, सीमा सुरक्षा दलाचे जवान सुधीर पंढरीनाथ थोरात शहीद झाले होते. 13 नोव्हेंबरला मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. सुधीर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अशातच सोशल मीडियावर शहीद सुधीर यांच्या अवघ्या दोन वर्षाच्या मुलाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुधीर यांच्या दशक्रिया विधीवेळी श्रद्धांजली अर्पण करताना त्यांचा अवघा दोन वर्षाचा मुलगा यश अखेरचा सलाम करताना दिसून येत आहे. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. वडिलांच्या अंगा-खांद्यावर खेळण्याच्या वयामध्ये यशच्या डोक्यावरून वडिलांचं छप्पर हरवलं आहे. 


सुधीर यांचे आर्मी हॉर्स रेजिमेंट मध्ये स्पोर्टस कोट्यातून सिलेक्शन झालं होतं. सुधीर थोरात भारतीय सैन्यात भरती झाले तेव्हा त्यांचा फिटनेस, कौशल्य ओळखून BSFने त्यांना विविध स्पर्धांमध्ये आपलं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी सोपवली. गेली अनेक वर्षे त्यांनी ती लिलया पेलली. एवढंच नव्हे तर आपल्या विभागाला पहिल्या-दुसऱ्या क्रमांकाची अनेक पदकं देखील जिंकून दिली होतीत.


दरम्यान, 14 तारखेपासून मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे स्पर्धा सुरु झाल्या होत्या. मात्र आदल्या दिवशी अघटीत घडलं. प्रॅक्टिस दरम्यान घोड्याची धडक बसल्याने सुधीर यांना वीरमरण आलं. देशसेवेत आपल्या जीवाची बाजी लावून शहीद झालेल्या प्रत्येक सैनिकाला भावपूर्ण श्रद्धांजली.