जयप्रभा स्टुडिओची मालकी लता मंगेशकर यांच्याकडेच
जयप्रभा स्टुडिओची मालकी लता मंगेशकर यांच्याकडेच राहणार आहे.
कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ बाबत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने केलेला दावा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओची मालकी लता मंगेशकर यांच्याकडेच राहणार आहे. या निर्णयामुळे लता मंगेशकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जयप्रभा स्टुडिओ ही लता मंगेशकर यांच्या खाजगी मालकीची असून त्यावर कोणतेही आरक्षण नाही. त्यामुळे स्टुडिओची मालकी लता मंगेशकर यांच्याकडेच राहणार असून त्यावर बांधकाम करण्यास मुभा राहणार आहे असे न्यायालयाने सांगितले. लता मंगेशकर यांच्याविरुद्ध अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि चित्रपट व्यावसायिकांनी दाखल केलेला दावा कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.
चित्रपटनिर्मितीची अस्मिता अशी ओळख जयप्रभा स्टुडियोची आहे. जयप्रभा स्टुडिओ हा हेरिटेज वास्तू यादीत समावेश करण्यात आला. या समावेश यादी विरोधात सर्वोच्च न्यायालयात लता मंगेशकर यांनी एक याचिका दाखल केली होती. कोल्हापूर महापालिकेने जिल्ह्यातील ज्या ७७ वास्तू हेरिटेज यादीत समाविष्ट केल्या होत्या. त्यामध्ये जयप्रभा स्टुडियोचा समावेश होता. मात्र जयप्रभा स्टुडिओची सध्याची साडेतीन एकर जागा व्यक्तीगत मालकीची असल्यामुळे ती परस्पर हेरिटेज वास्तूच्या यादीत समाविष्ट करता येणार नाही, या मुद्द्यावर लता मंगेशकर यांनी याचिका दाखल केली होती.
स्टुडिओची जागा विकासकाला देण्याविरोधात दावा करण्यात आला होता. जयप्रभा स्टुडिओची जागा चित्रपट व्यवसायाच्या वापराकरिता राहावी अशी चित्रपट महामंडळ आणि कोल्हापूरकरांची भूमिका होती. आता या निर्णयाविरोधात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ न्यायालयात दाद मागणार आहे.