प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जयप्रभा स्टुडिओचं जतन होण्यासाठी कोल्हापूरकर आग्रही आहेत. मात्र लता मंगेशकरांनी 2 वर्षांपूर्वीच स्टुडिओची जमीन विकून टाकल्याचं उघड झालं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ. या स्टुडिओची जमीन बिल्डरच्या घशात जाऊ नये, यासाठी कोल्हापूरकरांनी मोठा संघर्ष उभारला. मात्र आता लता मंगेशकरांनी 2 वर्षांपूर्वीच स्टुडिओची जमीन विकल्याचं समोर आलं आहे. 


मंगेशकरांनी ही जागा विकू नये, यासाठी कोल्हापूर महापालिकेनं 2 वेळा ठराव केला होता. असं असताना नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या दोन पुत्रांनी साडेसहा कोटींना जमीन खरेदी केली आहे. 



लतादीदींच्या निधनानंतर जयप्रभा स्टुडिओच्या जागेत त्यांचं स्मारक व्हावं, अशी कल्पना पुढे आली. याबाबत चाचपणी सुरू झाल्यानंतर जमीनीची विक्री झाल्याचं उघड झालं.  राजाराम महाराज आणि आक्कासाहेब महाराज यांनी मराठी चित्रसृष्टी वाढावी म्हणून जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओंची स्थापना केली. जयप्रभा स्टुडिओचा व्यावसायिक वापर छत्रपतींचाच अपमान असल्याची अनेकांची भावना आहे. 


राज्य सरकारची तयारी असेल, तर जागा परत देण्याची तयारी राजेश क्षीरसागर यांनी दर्शवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास जयप्रभा स्टुडिओशिवाय पूर्ण होणार नाही. 


कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी पहिला फिल्म कॅमेरा कोल्हापुरात तयार केला. प्रभात फिल्म कंपनीनं ‘अयोध्येचा राजा’ कोल्हापुरातच बनवला. चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांनी जयप्रभामध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. कोल्हापूरकरांच्या भावनांचा आदर करून क्षीरसागरांचे पुत्र आणि सरकारनं स्टुडिओचं जतन करावं, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.