पुणे : शैक्षणिक सुविधांसह रोजगाराच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मूक-बधिर मुकांवर लाठीमार झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयासमोर त्यांचं आंदोलन सुरु होतं. या दरम्यान काही तरुणांनी बॅरिकेट्स बाजुला सारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर सौम्य लाठिमार करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या मागणीसाठी अनेक कर्णबधिर विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले होते. परंतु, आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये संवादाचा अभाव दिसला. 



आंदोलन हिंसक वळण घेतंय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागल्याचं पोलिसांनी म्हटलंय. परंतु, पोलिसांनी असंवेदनशीलपणाचा कळस गाठल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी दिलीय. 


त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी कडक भूमिका घेत एका जागी ठाण मांडून बसण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास तिथून मुंबईकडे चालत जाणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. सरकार आपल्या मागण्यांविषयी असंवेदनशील असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय.


सकाळी ९ वाजल्यापासून हे आंदोलनकर्ते लोकशाहीच्या आणि शांततेच्या मार्गानं हे आंदोलन करत होते. आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी असे अनेक मोर्चे आपल्याला गेल्या अनेक वर्षांपासून काढावे लागले आहेत. परंतु, प्रशासनानं मात्र त्याकडे दुर्लक्षच केलंय. त्यामुळे आज पुन्हा एकदा शैक्षणिक सुविधांसाठी आम्ही हा मोर्चा काढला होता. आज आम्ही पुण्यातून मुंबईत जाणार होतो. परंतु, पोलिसांनी त्यालाही नकार दिला. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर इथूनच आम्ही मुंबईच्या दिशेनं पायी कूच करू, असा इशारा आंदोलकांनी दिलाय.  


दरम्यान, कर्णबधिरांच्या मोर्चावर लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. ही घटना सामाजिक न्यायाचे उल्लंघन व वंचितांच्या हक्कांची पायमल्ली करणारी आहे. या घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही... त्यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा, अशी टीका राष्ट्रीवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिलीय.