शिर्डीत साईभक्तांची आर्थिक लुबाडणूक, काय आहे हा लटकू गँग प्रकार?
साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मात्र आता लटकू गँगचा सामना करावा लागत आहे
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी सध्या साईभक्तांची मोठी गर्दी होत आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना मात्र आता लटकू गँगचा सामना करावा लागत आहे. शिर्डीत साईभक्तांची सर्रासपणे आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. ही लटकू गँग कशापद्धतीनं साईभक्तींची फसवणूक करत आहे. पाहुयात, या रिपोर्टमधून.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून लाखो भाविक येत असतात. साईबाबांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावेत या भावनेनं साईभक्त दूरवरून प्रवास करून साईनगरीत दाखल होतात. मात्र शिर्डीत दाखल होताच साईबाबांचं दर्शन घेण्याआधीच साईभक्तांना लटकू गँगचा सामना करावा लागतो. आता तुम्ही म्हणाल, ही लटकू गँग काय प्रकार...तर त्याचं असं आहे की, शिर्डीत दाखल होणा-या साईभक्तांवर या लटकू गँगची बारीक नजर असते. भाविक मंडळी आपल्या वाहनातून उतरण्याच्याआधीच चला दर्शन करून देतो, आमच्याकडूनच प्रसाद घ्या असा रेटाच ही लटकू गँग लावते. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेला भोळा भक्त मात्र ब-याचदा या गँगचा बळी ठरतो. साध्या साईभक्तांकडून मोठी लूट केली जाते. असे प्रकार शिर्डीत सर्रास घडताना दिसताहेत. पंजाबमधील काही साईभक्तांनी यापूर्वी असाच अनुभव आला होता. ते पुन्हा एकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेत. मात्र लटकू गँगपासून सावध राहा, असं आवाहनच ते करत आहेत.
झगडे फाटा इथून मोटरसायकलनं साईभक्तांचा पाठलाग केला जातो. आमच्याच दुकानात फुलप्रसाद घ्या , आमच्याकडेच रूम घ्या , आम्ही तुमचं दर्शन व्यवस्थित करून देतो असं आमिष दाखवून साई भक्तांची लुबाडणूक केली जाते. लटकू गॅंगच्या माध्यमातून लूट होत असल्याचा प्रकार आमच्या निदर्शनास आलाय. या प्रकाराला वचक बसत नाहीये. साईभक्तांची लूट थांबत नसून पोलीस प्रशासन झोपा काढते का..? असे आरोप करत शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.
कारवाई करत असून कुठल्याही भुलथापांना बळी पडू नका, असं आवाहन शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी झी 24 तास च्या माध्यमातून केलं आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणा-या साईभक्तांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. भाविकांची लूट थांबवण्यासाठी प्रशासन कधी पावलं उचलणार, हाच खरा प्रश्न आहे.