लग्नात 25 ऐवजी 200 वऱ्हाडाला आमंत्रण, भरारी पथकाने केली `ही` कारवाई
लॉकडाउनच्या काळात या आदेशाला केराची टोपली
शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने फक्त 25 जणांच्या उपस्थित लग्न समारंभ उरकण्याचे आदेश दिले होते. मात्र ऐन संचारबंदी, लॉकडाउनच्या काळात या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम लातूर जिल्ह्यात करण्यात आलंय.
देवणी तालुक्यातील तळेगाव भोपणी येथील राम गोविंद बिरादार यांनी त्यांच्या मुलीचा लग्न समारंभ मोठ्या थाटात केल्याचे पुढे आलं आहे. लग्न समारंभासाठी मोठा मंडप टाकल्याचे दिसून येत आहे. तर या सोहळ्यास जवळपास 250 ते 300 जणांना आमंत्रित केल्याचे तहसीलदारांच्या भरारी पथकाला निष्पन्न झालंय.
या लग्नान आणि जेवणाच्या पंगतीला बसलेल्या लोकांनी कसलंही फिजिकल डिस्टंसिंग ठेवलं नव्हतं. तर अनेकांच्या तोंडाला मास्कही दिसत नव्हते. त्यामुळे लग्न समारंभाचे आयोजन करणाऱ्या राम गोविंद बिरादार यांच्याकडून 50 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाय.
तसेच या दंडाची पावती तहसील कार्यालयात ग्रामसेवकाने जमाही केली आहे. 25 पेक्षा अधिक लोक लग्न समारंभात जमविल्यामुळेच हा दंड लावल्याचा उल्लेख पावतीवर करण्यात आलाय.