वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी चार मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका भीषण घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमधून समोर आला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर - सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. महामार्गावरुन जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट औसा येथील सीएनजी पंपाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील दोघांचा उपचारासाठी घेऊन जात असतानाच मृत्यू झाला आहे. तर चार जणांना गंभीर मार लागला असून त्यांच्यावर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात गंभीर जखमी मधील तिघे जण कारमधील आहेत तर एक जण हॉटेलमध्ये काम करणारा लहान मुलगा आहे. या चौघांची ही प्रकृती चिंताजनक आहे.



महामार्ग क्रमांक 361 वरील सीएनजी पेट्रोल पंपाजवळील एका हॉटेलवर भरधाव कारने अचानक धडक दिली. हैदराबादहून लातूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार थेट हॉटेलवर जाऊन धडकली.


या अपघातात 14 वर्षीय हॉटेल कामगार ओंकार कांबळे याचे दोन्ही पाय मोडले. कारमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील दोन गंभीर जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. या अपघाताचा थरार हॉटेलसमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लातूरकडे जाणारी कार भरधाव वेगाने हॉटेलमध्ये शिरली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी आलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.