मराठा आरक्षणासाठी संभाजी सेनेकडून रेलरोको, दिला हा इशारा
मराठा आरक्षण (Maratha reservation) मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत संभाजी सेनेकडून (Sambhaji Sena) रेल रोको करण्यात आले.
लातूर : LATUR RAIL ROKO AGITATION : मराठा आरक्षण (Maratha reservation) मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत संभाजी सेनेकडून (Sambhaji Sena) रेल रोको करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गुरुवारी संभाजी सेनेने मराठवाड्यातील लातूर, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यात रेल रोको आंदोलनाचा ईशारा दिला होता. त्या अनुषंगाने काल लातूर जिल्ह्यातील पानगाव रेल्वे स्थानकावर संभाजी सेनेने रेल रोको आंदोलन केले.
पानगाव रेल्वे स्थानकावर नांदेड-बेंगलोर एक्सप्रेस रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पानगाव रेल्वे स्थानकावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे रेल्वे रोखण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना बाजूला केले.
यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलक कार्यकर्ते करीत होते. परिणामी काही काळ रेल्वे थांबली होती. आंदोलन रोखण्यासाठी कालपासूनच पोलीस संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकडही करीत होते. जर सरकारने मराठा समाजाला मिळालेले आरक्षण दिलं नाही तर येत्या काळात यापेक्षा ही उग्र आंदोलनाचा इशारा संभाजी सेनेचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी दिला आहे.