शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : लातूरची तहान भागविणाऱ्या मांजरा धरणात पुढील वर्षभरासाठी जमा झालेल्या पाणीसाठ्याची पाहणी काँग्रेसचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केली. पहिल्यांदाच निवडून आलेल्या धीरज देशमुख यांनी थेट धनेगाव येथील मांजरा धरणावर जाऊन उजनी धरणाच्या पाण्याची मागणी लातूरसाठी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धरणात पुढील वर्षभरासाठी मृतसाठ्यात असलेले पाणी जपून वापरण्याचे आवाहनही केलं. सरकारने उजनी धरणातील पाणी ऑक्टोबर २०२० पर्यंत मांजरा धरणात आणण्याचे आश्वासन पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. पहिल्यांदाच आमदार झालेल्या धीरज देशमुख यांच्या हस्ते मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजनही यावेळी करण्यात आले. 



भविष्यात उसाची शेती ही ड्रीपद्वारे करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सरकारनेही ड्रीपवर ऊस लावून पाणी बचतीसाठी ड्रीपला १०० टक्के अनुदान देण्याची मागणी यावेळी केली. लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असून उसाशिवाय दुसरे शाश्वत पीक या भागात येत नसल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना ड्रीपद्वारे ऊस लागवडीसाठी प्रेरित केलं पाहिजे अशी अपेक्षा धीरज देशमुख यांनी यावेळी केली. 


मुळात धीरज यांचे वडील माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकाराचं जाळं लातूर जिल्ह्यात उभारलं. देशमुख परिवाराचे जवळपास ०६ साखर कारखाने जिल्ह्यात आहेत. ड्रीपद्वारे ऊस लागवडीसाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.