शशिकांत पाटील, झी मिडीया, लातूर : दुष्काळ आणि पाणी टंचाईचे तीव्र चटके सोसणाऱ्या लातूर जिल्ह्याच्या सोनवती येथील ग्रामस्थ हंडाभर पाण्यासाठी आपल्या जीव धोक्यात घालत आहेत. गावातील ६० फूट खोल कोरड्या विहिरीतील झऱ्याचे पाणी वाटी, ग्लास आणि झाडाच्या पानांच्या साहाय्याने तासंतास बसून एक हंडा भरत आहेत. त्यानंतर गावातील वृद्ध महिला आणि मुलं तो हंडा त्या कोरड्या विहिरीतील पायऱ्यांवरून जीव धोक्यात टाकून घरी घेऊन जात आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर शहरापासून ०८ किमी अंतरावर सोनवती गाव आहे. सध्या या गावात भीषण पाणी टंचाई आहे. पाणी मिळविण्यासाठी राना-वनात हंडे घेऊन गावातील ग्रामस्थांना फिरावे लागत आहे. मात्र पिण्यासाठी गाव ज्या विहिरीवर अवलंबून होते त्या विहिरींची ही अशी अवस्था आहे. गावात अद्याप पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु न झाल्यामुळे पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष येथील ग्रामस्थांना करावा लागतोय. गावातील लहान-थोर- वडील धारी मंडळी दिवसभर फक्त एक-एक हंडा पाणी पिण्यासाठी मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. विहिरीतील या झऱ्यातून हंडा भरण्यासाठी कुठे वाटी, कुठे ग्लास तर कुठे आधार आहे तो या झाडाच्या पानांचा. ०५ ते ०६ सहा तास या झऱ्यातील पाणी वाटी, ग्लासद्वारे भरल्यानंतर केवळ तीन हांडे पाणी मिळतं. पण हे पाणी मिळाल्यानंतर खरी कसरत आहे ती हा हंडा घेऊन वर चढण्याची. विहिरीच्या पायऱ्यांवरून पाय घसरून कुठली दुर्घटना झालीच तर जीव जाण्याचीच जास्त शक्यता असते. 


उतार वयात वृद्ध महिलांना येऊन पाणी भरावं लागतं आणि ते ६० विहिरीतून घेऊन घरीही जावं लागतं. कौशल्याबाई गिरीचा मुलगा वेगळा राहत असल्यामुळे आपल्याला पाणी भरल्याशिवाय पर्याय नसल्याचं त्या म्हणतात. पाणी न पियुन मरण्यापेक्षा पाणी भरताना पडून मेलं तरी चालेल असंही त्या सांगतात.



विशेष बाब म्हणजे सोनवतीच्या शेजारीच लातूरचे आमदार अमित देशमुख यांचे बाभळगाव आहे. तर शत प्रतिशत भाजपमय झालेल्या लातूर जिल्ह्यात आजमितीला ४५ टँकर सुरु आहेत. तरीही सोनवतीच्या या परिस्थितीकडे  कुठल्याही नेत्याचे अद्याप का लक्ष गेले नाही हा मोठा प्रश्न आहे. लातूर शहरापासून ०८ किमी अंतरावर असलेल्या सोनवती प्रशासन कधी टँकर सुरु करणार हे पाहणे आता महत्वाचं आहे.