लातूरमध्ये महाराजांबद्दल अफवा पसरली आणि गर्दी लोटली, सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा
लातूरमधल्या महाराजांबद्दल एक अफवा पसरली आणि बघता बघता प्रचंड गर्दी झाली.
शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूरमधल्या महाराजांबद्दल एक अफवा पसरली आणि बघता बघता प्रचंड गर्दी झाली. हा सगळा प्रकार निस्तरता निस्तरता प्रशासनाच्या नाकी नऊ आले. अहमदपूरमध्ये डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली, त्यामुळे महाराजांच्या भक्तांनी मोठी गर्दी केली. १०४ वर्षांचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे. मात्र महाराजांची प्रकृती चांगली आहे, भाविकांनी चिंता करु नये, असा संदेश देण्यात आला.
'माझी प्रकृती चांगली आहे. काळजी करू नका. तुमची भक्ती आणि श्रद्धा माझं आयुष्य वाढवत आहे. गुरू भक्ती करा आणि मला व्यवस्थित रितीने जगू द्या', असं महाराज त्यांच्या भक्तांना म्हणाले.
कोरोनाच्या काळात एकदम एवढी गर्दी झाल्यानं प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन, पोलिसांकडून करण्यात आलं आहे. महाराजांची तब्येत थोडी खराब झाली होती, वैद्यकीय टीम इकडे आहे. घाबरण्याचं कारण नाही. आता गर्दी हटवण्यात आली आहे, असं पोलीस उपअधिक्षक अश्विनी शेलार यांनी सांगितलं.
कोरोना संकटाच्या या काळात झालेल्या या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा मात्र बोऱ्या वाजला.