Latur Stray Dogs: टिटवाळा येथे 68 वर्षाच्या महिलेवर मोकाट कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ताजी असताना आता लातूरमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. लातूरमध्ये औसा शहरातील कुरेश गल्लीत एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला करून मुलीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यांचा वेळीच प्रतिबंध करण्याची मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूरमधील कुरेश गल्लीत आयना सल्लाउद्दीन कुरेशी ही तीन वर्षाची लहान मुलगी घराबाहेर इतर मुलांसोबत खेळत होती. यावेळी एका मोकाट कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. या कुत्र्याने तिला अक्षरशः लोळवत तोंडात तिला धरून फरफटत नेले. या लहान मुलीला अनेक ठिकाणी चावे घेऊन लचके तोडले. मान, हात, पाठ, चेहरा फोडून काढला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. या लहान मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मुलीची प्रकृती चिंताजनक 


रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या मुलीला आजूबाजूच्या लोकांनी कुत्र्याच्या तावडीतून सोडवले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने लातूरला उपचारासाठी हलविण्यात आले. 


 मोकाट कुत्र्याचा प्रश्न ऐरणीवर 


औसा शहरात मोकाट कुत्र्याचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत असतांना हातावर हात धरून बसलेल्या पालिका प्रधासनाविरोधात नागरिक आक्रमक होत आहेत.


टिटवाळ्यात काय झालं होतं?


कुत्र्यांच्या झुंडीने एका महिलेवर प्राणघातक हल्ला केला. तिच्या शरीरावर चहुबाजून चावा घेत तिला फरफटत ओढत नेले. ती ओरडत राहिली पण कुत्रे तिला चावतच राहिले. कुत्र्यांच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होतंय. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. संबंधित अधिकारी घटनेची चौकशी करत आहेत. शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टिटवाळा येथील रिजन्सी कॉम्प्लेक्सच्या आवारात एका 68 वर्षीय महिलेवर कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. एवढेच नव्हे तर कुत्र्यांनी महिलेला 50 मीटर अंतरापर्यंत ओढून नेले. त्यानंतर काही लोक धावत आले, त्यांना पाहताच कुत्रे महिलेला सोडून पळून गेले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.जखमी महिलेला गोवेली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास जखमी महिलेला गोवेली रुग्णालयात आणण्यात आले. महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्यावर, पायावर आणि हातावर खोलवर जखमा झाल्यामुळे ती काही बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याची माहिती डॉ.दीपलक्ष्मी कांबळे यांनी दिली. महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर लगेचच या महिलेला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला कळवा रुग्णालयात पाठवले. तेथून आता तिला मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.