मुंबई  : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिदक्षता विभागात (आयसीयु) दाखल असलेल्या कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा या तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात अकोला, जळगाव, सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा लवकरच कार्यान्वित होणार आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर नियंत्रणासाठी टेलीआयसीयु सुविधा फायदेशीर ठरेल, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.


आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलीआयसीयु तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेषज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल. जालना, सोलापूर, औरंगाबाद येथील रुग्णालयात ही सुविधा पुढील आठवड्यात कार्यान्वित होऊ शकते, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.



मेडीस्केप इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उत्तर दायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ही सुविधा काही महिने देण्यात येणार आहे. भिवंडी येथील आयजीएम उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयुमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून दिल्ली येथील विशेषज्ञांकडून गंभीर रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाते आणि त्यांना कुठले उपचार द्यायचे याचे मार्गदर्शन केले जाते.


दिवसातून पाच वेळा या विशेषज्ञांकडून रुग्णांची विचारपूस केली जाते. राज्यात अन्य ठिकाणी करण्यात येणारी ही सुविधा वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात आहे, मात्र भिवंडी त्याला अपवाद ठरले असून ही सुविधा असणारे ते राज्यातील पहिले उपजिल्हा रुग्णालय ठरले आहे. येथील टेलीआयसीयु कक्ष आरोग्यमंत्री यांच्या दिवंगत मातोश्री शारदाताई यांना समर्पित करण्यात आल्याचे मेडीस्केप फाऊंडेशनतर्फे सांगण्यात आले.


यावेळी मेडीस्केप इंडिया फाऊंडेशनच्या डॉ. सुनीता दुबे, डॉ. संदीप दिवाण यांनी या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. भिवंडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अनिल थोरात यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी आयसीयुमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली.