रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : अरारारारा... खतरनाक.... लावणीस्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा अक्षरश: धुडगूस पाहिला मिळाला. सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील बेडगमध्ये हा प्रकार घडला. गौतमीच्या अदांनी घायाळ झालेल्या प्रेक्षकांनी अक्षरशः हैदोस घातला. मैदानात जागा पुरेना म्हणून लोकं थेट शाळच्या कौलांवर चढली. गर्दीच्या हुल्लडबाजीत शाळेची कौलं फुटली. शाळेतलं तारजाळीच्या कंपाऊंडचं नुकसान झालं. काही प्रेक्षक गौतमीची लावणी पाहण्यासाठी चक्क झाडावर चढली. प्रेक्षकांच्या भाराने अनेक झाडंही मोडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेक्षक तर प्रेक्षक पण आयोजक आणि शिक्षकांचंही भान सुटलं... विद्यार्थ्यांना वळण लावणाऱ्या शिक्षकांचीही कंबर लावणीच्या ठेक्यावर लचकली. जिल्हा परिषदेच्या शाळेत लावणीचा धुमाकूळ झाल्यावर बेडग गावकरी प्रचंड संतापले.  आणि त्यांनी आयोजक आणि शिक्षकांवर कारवाई मागणी केली.


झी 24 तासनं लावणीच्या कार्यक्रमातला हा सगळा धुडगूस दाखवला. त्यानंतर  झिंगाट लावणी कार्यक्रम ठेवणाऱ्या आणि शाळेची कौलं फोडणाऱ्या आयोजक गजराज मंडळाला जाग आली. झी 24 तासच्या दणक्यानंतर गजराज मंडळानं शाळेची डागडुजी सुरू केली.



धन्य ते आयोजक... आणि धन्य त्यो गौतमी पाटीलचा छप्परतोड डान्स... लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणारी गौतमी आणि तो डान्स पाहणारी तरूणाई बेभान झाली की पिढ्या घडवणारी शाळाही कशी कोसळते त्याचं हे ज्वलंत उदाहरण. शाळेच्या कौलांसह महाराष्ट्राच्या संस्कृतीचाही यावेळी चुराडा झाला हे नक्की.