राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय, बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात सर्वात मोठा आरोप
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
Badlapur Case Accused Akshay Shinde Shoots : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली याबाबत अनेक सवाल केले जात आहेत. अक्षय शिंदे याला पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी तळोजा जेलमध्ये (Taloja Jail) नेत असताना हा सगळा प्रकार घडला आहे. या प्रकरणात आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आल्याची चर्चा आहे. अशातच आता या प्रकरणात सर्वात मोठा आरोप करण्यात आला आहे. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी असीम सरोदे उच्च न्यायालयात जाणार आहेत.
वकिल असीम सरोदे अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी असीम सरोदे यांनी केली. असीम सरोदे यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून असीम सरोदे यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
महत्वाची बातमी... मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सापडली 20 लाखांची कॅश; प्रवाशांमध्ये खळबळ
बदलापूर घटनेतील अत्याचारग्रस्त मुलीच्या व तिच्या परिवाराच्या बाजूने वकीलपत्र दाखल केल्यापासून मी एक वेगळाच दबाव बघतोय. आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणे आवश्यक असतांना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आले?, पोलिसांची बंदूक साधरणतः लॉक असते ती आरोपीने कशी वापरली? पोलिसांवर दबाव होता. येथील राजकीय लोकांची प्रतिष्ठा महत्वाची होती आणि त्याला ठरवून स्वतःला मारून घेण्याची परिस्थिती तयार करून देण्यात आली का? आम्ही ऊच्च न्यायालयाच्या लक्षात उद्याच हा सगळा प्रकार आणून देणार आहोत. शेवटी राजकारणाचा विजय झाला आणि न्याय मारला जातोय. अशी पोस्ट असीम सरोदे यांनी केली आहे.
अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला?
तळोजा जेलमध्ये पोलिसांच्या बंदुकीतून अक्षय शिंदेने गोळी झाडली. रुग्णालयात उपचार सुरु असताना अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेनं पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचं पिस्तुल हिसकावलं आणि 3 ते 4 गोळ्या झाडल्या. याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनीही गोळीबार केला. यात अक्षय शिंदे गंभीर जखमी झाला. त्याला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना अक्षय शिंदेनं झाडलेली गोळी लागली असून ते यामध्ये जखमी झाले आहेत.