आणखी एका धरणाला गळती, लोकांमध्ये भीतीचं वातावरण
प्रकल्पाच्या मुख्य भिंतीलाही तडे
नितेश महाजन, झी मीडिया, जालना: भोकरदन तालुक्यातील तिसऱ्या धरणालाही गळती सुरु झाली आहे. मुसळधार पावसाने पाटबंधारे विभागाची पोलखोल केली आहे. भोकरदन तालुक्यातील पद्मावती या मध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीलाही तडे गेल्याचं उघड झालं आहे. या प्रकल्पाच्या मुख्य भिंतीला तडे गेल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरु झाली आहे. काल या धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस झाल्यानं धरणात 75 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. त्यानंतर धरणाच्या मुख्य भिंतीतून पाणी गळती सुरु झाली आहे.
याआधी भोकरदन तालुक्यातील धामणा, जुई या प्रकल्पातून पाणी गळती झाल्यानं या धरणांच्या परिसरात देखील भीतीचं वातावरण कायम आहे. आता पद्मावती धरणाला गळती लागल्यानं या प्रकल्पाला लागलेली गळती रोखण्याची मागणी होत आहे. प्रकल्पाच्या आजूबाजूला देखील जमिनीला भगदाड पडल्यानं गळतीचं प्रमाण वाढण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे.
चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण फुटल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला होता. तर ८ जण बेपत्ता झाले आहेत. रत्नागिरीच्या तिवरे धरण फुटीची एसआयटीकडून चौकशी होणार आहे. या दुर्घटनेनंतर आता इतर धऱणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. धरणाच्या आजुबाजुला राहणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे.