Viral News: `गावात गौतमी येतेय, सुट्टी द्या....`; रजेचा अर्ज व्हायरल होताच एसटी चालकाने सांगितलं सत्य
Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने डान्सर गौतमी पाटीलला डोक्यावर घेतले आहे. लांब लांबचे अंतर गाठून तरुणाई गौतमीचा डान्स पाहण्यासाठी पोहचत आहे. अशातच सांगलीतल्या एका बसचालकाने गावात गौतमी पाटील येणार असल्याने चक्क दोन दिवसांची सुट्टी मागितली आहे.
ST Driver Viral Leave Application: डान्सर गौतमी पाटीलने (Gautami Patil) तिच्या अदांनी महाराष्ट्रातल्या तरुणाईला अक्षरक्षः वेड लावलं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात गौतमीचा (Gautami Patil Dance) कार्यक्रम आयोजित करण्यासाठी चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षरक्षः वाऱ्यासारखी गौतमी पाटील महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तिच्या नृत्यामुळे पोहोचली आहे. त्यामुळे सगळीकडेच तिचे लाखोंच्या संख्येने चाहते निर्माण झालेत. अशाच एका चाहत्याने गावात गौतमी पाटील येणार असल्याने चक्क सुट्टीसाठी अर्ज केलाय. या पठ्ठ्याचा अर्ज आता सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला असून अनेकांनी तो पाहून डोक्यावर हात मारला आहे.
गावात गौतमी पाटील येणार आहे आणि दोन दिवसांची सुट्टी द्या, असा एका एसटी कर्मचाऱ्याचा अर्ज सोशल मीडियावर चांगलाच अर्ज झाला आहे. तासगाव (tasgaon) एसटी आगारातील एका बसचालकाने गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम असल्यामुळे दोन दिवसांची रजा मागितली आहे. बस कर्मचाऱ्याने असा अर्ज सांगली जिल्ह्यातील तासगाव आगारप्रमुखाकडे केला आहे. त्यामुळे आता या अर्जाची चर्चा होऊ लागली आहे.
तासगाव तालुक्यात 21 मे रोजी वायफळे येथे गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम होणार आहे. पहिल्यांदाच तासगावात कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाची तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. अशातच सांगलीच्या तासगाव एसटी डेपोतील बसचालक प्रकाश यमगर यांनी हा अर्ज आगारप्रमुखांकडे केला आहे. 'गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून दोन दिवसांची रजा मिळावी,' असा उल्लेख रजेच्या अर्जावर केला आहे. 22 आणि 23 मे रोजी दोन दिवसांची रजा मिळण्यासाठी गुरुवारी तासगाव आगार प्रमुखांकडे हा अर्ज देण्यात आला आहे.
सत्य काय?
दरम्यान, हा अर्ज समोर आल्यानंतर तासगाव एसटी प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. ज्या चालकाच्या नावाने हा अर्ज लिहिण्यात आला आहे तो खरा आहे की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. अशातच ज्या एसटी चालकाच्या नावाने हा अर्ज आलाय त्याने अशा प्रकारचा कोणताही अर्ज केला नाही असे तासगाव एसटी आगाराने म्हटलं आहे. एसटी चालकाकडून अशा प्रकारे अद्यापतरी कोणत्याही रजेचा अर्ज हा दाखल केला गेला नाही,असं तासगाव एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र संबंधित एसटी चालकाकडून रजा मागण्यात आली होती. मात्र तशा प्रकारचा अर्ज त्याने एसटी प्रशासनाकडे अद्याप दिला नाही असे एसटी प्रशासनाने म्हटलं आहे. ज्या कर्मचाऱ्याच्या नावाने हा अर्ज देण्यात आला आहे त्याने मात्र याबाबत सत्य सांगितलं आहे. आपल्या नावाने कोणीतरी खोडसाळपणाने हा अर्ज तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या अर्जावर असणारी सही देखील बोगस असल्याचं संबंधित चालकाकडून सांगण्यात आलं आहे.