बारामती : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणजे भलतेच मनमोकळे व्यक्तिमत्व.  इतके की, जाहीर व्यासपीठावरून बोलतानाही ते मनात काही ठेवत नाहीत. मग ते धरणातले पाणी असो किंवा जनतेचे प्रेम. दादांचं कसं जे असतं ते रोखठोक. मग नंतर आत्मक्लेश करावा लागला तरी बेहद्दर. नुकतेच त्यांनी आपण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार ते जाहीर सांगितले. लोक प्रेमाने त्यांना दादा म्हणतात.


दादांना राज्यभरातून निमंत्रण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थात, दादांसारखे तगडे व्यक्तिमत्व आणि आक्रमक नेता आपल्या मतदासंघाचा प्रतिनिधी नसावा असे कोणाला वाटेल? त्यामुळे त्यांना राज्यभरातून मागणी आहे. अनेक मतदारसंघातील लोक आपल्याला आपल्या मतदारसंघातूनच निवडणूक लढवा, असा आग्रह करत असल्याचे स्वत: दादाच सांगतात. पण, लोकांचे ऐकतील आणि लागलीच निर्णय घेतली ते दादा कसले? लोकांच्या मागणीला दादांनी आपल्या अनुभवी मुरब्बीपणाची जोड देत लागलीच खुलासा केला. निमित्त होते राष्ट्रवादी-काँग्रेस कार्यकर्ता मेळावा.


बारामतीकरांनो तुम्ही म्हणत असाल तर....


दादांनी आगामी निवडणुकीबाबत खुलासा करण्याआधीची पार्श्वभूमी अशी की, दादा यावेळी कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा. पण, गंमत अशी की, दादांना जरी कर्जत-जामखेड किंवा राज्यभरातून मागणी असली तरी दादांचे प्रेम बारामतीकरांवरच. कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दादा म्हणाले, राज्यातले लोक आमच्याकडे येऊन निवडणूक लढवा असे म्हणतात. ते त्यांचे माझ्यावरचे प्रेम आहे. पण, बारामतीच्या लोकांचेही आजवर मला खूप प्रेम लाभले आहे. त्याचे प्रेम पाहून उर भरून येतो. तिथून मी एक लाखाहून अधिक वेळा निवडून येतो, असे बोलता बोलताच दादांनी मध्येच बारामतीकरांनो तुम्ही म्हणत असाल, तर मी बारामतीतून आमदारकी पुन्हा लढवितो, असा पोलिटीकली करेक्ट यॉर्कर टाकला आणि उपस्थितांनी कौल देत टाळ्यांच्या गजरात तो मैदानाबाहेर टोलावला. त्यामुळे अजित दादांनी पुन्हा एकदा आपण बारामतीमधूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. तसेच, बारामतीकरांचे प्रेम दाखवत इतर इच्छूकांची विकेट परस्परच कापली.


गड्या आपला गावच बरा


दरम्यान, दादांच्या या भूमिकेचे बारामतीकरांनी प्रचंड स्वागत केले असले तरी, राज्यताल त्यांच्या चाहत्यामद्ये मात्र काहीशी प्रेमळ नाराजी आहे. काही मंडळींनी तर, 'नजरेसमोर महाराष्ट्र पण, हृदयात फक्त बारामती' अशी दादांचे अंतर्मन असल्याचे म्हटले. तर, काहींनी दादा एकदम मनमोकळा माणूस असल्यामुळे ते 'गड्या आपला गावच बरा' असे म्हणतात असेही म्हटले.