राजापूरमध्ये विहिरीत पडलेले दोन बिबटे जेरबंद
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यामधल्या दसूर गावात, विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागानं यशस्वीपणे बाहेर काढलं.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यामधल्या दसूर गावात, विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागानं यशस्वीपणे बाहेर काढलं.
दसूर गावातल्या कमलाकर अर्जून सुर्वे यांच्या घराजवळच्या विहिरीत शिकारीच्या शोधात हा बिबट्या आला होता. त्याची माहिती मिळताच रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल बी आर पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन, तब्बल पाच तासांच्या अथक प्रयन्तांनंतर बिबट्याला जेरबंद केलं.
विशेष म्हणजे राजापूरमधल्या दसूरनंतर राजापूर तालुक्यातल्याच परुळे गावातही एका विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती वनक्षेत्रपाल बी आर पाटील यांना मिळाली. परुळे गावातल्या चंद्रकांत हरी खापणे यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला होता. तिथे पथकासह पोहोचून, बी आर पाटील यांनी या बिबट्याला विहिरीतून सुखरुपपणे बाहेर काढून पिंजऱ्यात जेरबंद केलं.
नर जातीचा हा बिबट्या अंदाजे ५ ते ६ वर्षांचा असल्याचं सांगण्यात आलंय. या दोन्ही बिबट्यांना जंगलात त्यांच्या सुरक्षित अधिवासात सोडण्यात आलं.