रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान
विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला जीवनदान देण्यात वनविभागाला यश आले आहे.
रत्नागिरी : विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला जीवनदान देण्यात वनविभागाला यश आले आहे. खेडशी गावातल्या रोहित राजेंद्र चव्हाण यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला होता.रत्नागिरी जिल्ह्यातबिबटे विहिरीत पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
शुक्रवारी पहाटे भक्ष्याच्या पाठलाग करताना एक बिबट्या विहिरीत पडला. ही बाब सकाळी चव्हाण कुटुंबियांच्या लक्षात आली. त्यानंतर अप्पा मेस्त्री यांनी लगेचच याची खबर वनविभागाला दिली. दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.
वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर काही वेळातच बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. जेरबंद करण्यात आलेला बिबट्या नर जातीचा असून तो अंदाजे तीन ते साडेतीन वर्षांचा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले.