प्रफुल्‍ल पवार,  रायगड : जिल्ह्यात लेप्टोचं थैमान सुरु असून तीन आठवड्यात ८ जणांचा बळी गेलाय. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथकंही तैनात करण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेणच्‍या वाशी खारेपाटातील गावांमध्‍ये लेप्टोनं थैमान घातलंय. मागील तीन आठवड्यात या तापानं आठ जणांचा बळी घेतलाय. आता या भागांमध्ये वैद्यकीय आधिकार्‍यांची पथकं नेमण्यात आली असून त्यांच्या मार्फत रूग्णावर उपचार केले जातायत. 


घरोघरी फिरून या आजाराबाबत जनजागृती केली जात असून डॉक्‍सिसायक्‍लीन गोळयांचं वाटप करण्‍यात येतंय. नागरिकांनी याबाबत काळजी घेण्‍याचे आवाहन आरोग्‍य विभागानं केलंय. 


पेण तालुक्यातल्या जिते, खारसापोली, रावे, कळवा, दादर या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापाची साथ आहे. या तापाच्या रुग्णांची संख्या वाढतेय. तीन आठवड्यात या भागात लेप्टोनं आठ जणांचा मृत्यू झालाय. हे बळी गेल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. 


त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांची पथके पाठवून या विभागातल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी १० जणांच्या रक्ताचे नमुने मुंबईतील जे.जे. रूग्णालयात पाठवण्यात आले. त्यापैकी आठ रूग्णांना लेप्टोची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्याचा अहवाल प्राप्त झालाय. 


दरम्यान, ज्‍या गावांमध्‍ये हा आजार पसरलाय त्याठिकाणी अस्‍वच्‍छतेचं साम्राज्‍य पाहायला मिळतंय. आरोग्‍य विभागाबरोबरच स्‍थानिक ग्रामपंचायतींनी परिसर स्‍वच्‍छतेसाठी पावलं उचलणं गरजेचं आहे.