प्रफुल्ल पवार / अलिबाग : रायगड जिल्‍हयात ( Raigad district) कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असतानाच आता लेप्‍टोस्‍पायरोसिसने (Leptospirosis)  डोके वर काढले आहे. अलिबागसह पेण तालुकयात लेप्‍टोचे (Lepto) संशयित रूग्‍ण आढळले आहेत . मात्र जिल्‍हा परीषदेची आरोग्‍य यंत्रणा झोपेत आणि संभ्रमात असल्‍याचे दिसून येत आहे. या आजारासंदर्भात भीती व्‍यक्‍त केली जात असतानाच कुठलीही जनजागृतीची मोहीम राबवली जात नसल्‍याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिबाग तालुक्‍यातील धोकवडे येथील लेप्‍टोच्‍या संशयित रूग्‍णाचा मुंबईतील लीलावती रूग्‍णालयात मृत्‍यू झाला तर नागाव येथे तीन संशयित रूग्‍णांचा मृत्‍यूने कवटाळले मात्र अद्यापही आरोग्‍य यंत्रणा या रूग्‍णांचा मृत्‍यू नेमका कशामुळे झाला हे सांगू शकलेली नाही . नागावचे सरपंच निखील मयेकर यांनी यासंदर्भात जिल्‍हाधिकारी यांच्‍यासह जिल्‍हास्‍तरीय आरोग्‍य यंत्रणाना याची माहिती दिली आहे .  दरम्‍यान अलिबाग तालुकयात लेप्‍टोचे साधारण १० संशयित रूग्‍ण असल्‍याचे  तालुका आरोग्‍य अधिकारी यांनी सांगितले.


अलिबाग बरोबरच शेजारच्‍या पेण तालुक्‍यातदेखील लेप्‍टोचे संशयित रूग्‍ण असल्‍याचे जिल्‍हा परीषदेचे माजी कृषी सभापती प्रमोद पाटील यांनी सांगितले . मात्र आरोग्‍य यंत्रणा त्‍याकडे डोळेझाक करीत असल्‍याचा आरोप पाटील यांनी केला आहे. लेप्‍टोच्‍या साथीमुळे ग्रामीण भागात नागरीकांमध्‍ये भीतीचे वातावरण आहे मात्र जिल्‍हा परीषदेच्‍या आरोग्‍य यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. 


कापणीला जाताय जरा जपून


लेप्‍टोस्‍पायरेसीस या आजाराचा फैलाव जनावरांच्‍या मलमूत्रातून होत असतो . विशेषतः शेतामध्‍ये धान्‍य खाण्‍यासाठी येणारे उंदीर या आजाराचा फैलाव अधिक करतात . त्‍यामुळे दरवर्षी साधारण भातकापणीच्‍या हंगामात या रोगाचा प्रसार होत असतो . पायाला किंवा हाताला जखम झाली असेल तर त्‍याव्‍दारे जनावरांच्‍या मलमूत्राने दूषित झालेले पाणी शरीरात शिरते आणि हा आजार उदभवतो .  त्‍यामुळे भातकापणीसाठी शेतात जाणार असाल तर काळजी घेणे आवश्‍यक आहे. शेतात काम करताना पायात गमबूट घालावेत , जखमा झाल्‍या असतील तर त्‍यावर तातडीने उपचार करावेत , असं आवाहन आरोग्‍य यंत्रणेने केले आहे.
 
 लेप्‍टोच्‍या आजारासंदर्भात तक्रारी आल्‍या आहेत . आम्‍ही त्‍याची शहानिशा करतो आहोत . संशयित रूग्‍णांच्‍या रक्‍ताचे नमुने तपासणीसाठी घेण्‍यात आले आहेत . त्‍यांचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे.  ज्‍या भागात संशयित रूग्‍ण सापडले आहेत त्‍या भागात डॉक्‍सीसायक्‍लीन गोळयांचा पुरवठा करण्‍यात आला आहे . औषधे पुरवताना खास शेतामध्‍ये कापणीच्‍या कामासाठी जाणारया वर्गावर लक्ष केंद्रीत करण्‍यात आले आहे, अशी माहिती अलिबाग तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत घासे  यांनी दिली. 


काय आहेत लक्षणे?                        


ताप येणे , दम लागणे , सांधेदुखी अशी लेप्‍टोस्‍पायरेसीस  या आजाराची लक्षणे आहेत. जिल्‍हयात  या आजाराची चाचणी करण्‍यासाठी जिल्‍हा रूग्‍णालयात यंत्रणा कार्यान्‍वीत आहे. ती पूर्णपणे मोफत केली जाते. संशयित रूग्‍णांनी आपली चाचणी करून घेणे गरजेचे आहे. या आजाराकडे दुर्लक्ष झाल्‍यास आणि वेळीच उपचार न घेतल्‍यास  तो बळावतो आणि त्‍यात रूग्‍णाचा मृत्‍यू होवू शकतो. त्‍यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका . तातडीने तपासणी करून उपचार घ्‍यावेत, अशी माहिती जिल्‍हा शल्‍यचिकीत्‍सक डॉ. सुहास माने यांनी दिली.