मुंबई : होळीचा सण अगदी दोन दिवसावर आलाय. होळीनिमित्त मुंबईतील चाकरमानी आपल्या गावी हजेरी लावत असतात. पण, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक चाकरमान्यांना आपल्या गावी पोहोचता येत नाही. तर, खाजगी गाडयावाले मनमानी पद्धतीने भाडे आकारत आहेत. याबद्दल शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेचे लक्ष वेधले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधिमंडळाने ठराव करून शिमग्याच्या सणासाठी उद्या सुट्टी दिली. पण, कोकणात गावोगावी जाणाऱ्या एसटी गाड्या काही कारणामुळे सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक चाकरमानी मुंबईत अडकून पडले आहेत. 


याचवेळी ज्याच्या खाजगी गाड्या आहेत चालक, मालक, खाजगी वाहतूकदार हे तीन ते चार पट भाडे आकारत आहेत. हे खाजगी वाहतूकदार प्रवाशांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे या खाजगी वाहतूकदारांच्या मनमानी कारभाराला चाप लावणार का? परिवहन विभाग त्यांच्यावर काही कारवाई करणार का? असा सवाल आमदार जाधव यांनी केला. 


याला उत्तर देतं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की, यासंदर्भात कालच परिवहन आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत या खाजगी वाहतूकदारांना जास्त भाडे घेता येणार नाही. तसे करताना कुणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 


तसेच, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काही आगारातील बसेस कोकणात वळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोकणात साजरा होणाऱ्या या सणात लोकांची गैरसोय होणार नाही याकडे परिवहन विभागाचे पूर्ण लक्ष असल्याचे परिवहन मंत्री परब यांनी सांगितले.