रत्नागिरी : राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांच्या अटकेनंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनआशिर्वाद यात्रेनिमित्ताने नारायण राणे आज संगमेश्वरच्या गोळवली गावात आले होते. त्याच ठिकाणी पोलिसांनी राणेंना कागदपत्रं दाखवली आणि अटक करण्यात येत असल्याचं सांगितलं. सरकारी आणि खासगी डॉक्टरांनी घटनास्थळी दाखल होऊन राणेंची तपासणी केली. त्यानंतर सव्वा तासाने राणेंना अटक केली.


दरम्यान, भाजप नेते प्रसाद लाड यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. नारायण राणे जेवत असताना पोलिसांनी जेवणाचं ताट ओढून घेतलं असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. 'तुम्हाला अटक करायची असेल तर करा पण राणेसाहेबांना जेवण करु द्या, असं आम्ही पोलिसांना सांगितलं. त्यांचं जेवण झाल्यानंतर बीपी, शुगर चेक करणे आवश्यक होतं, त्यांना ECG करायचा होता, त्यांना काहीही करु दिलं नाही. भरल्या ताटावरुन नारायण राणेंना खेचलं, पोलिसांनी अजूनही अटक दाखवलेली नाही. माझा स्पष्ट आरोप आहे, राणे साहेबांच्या जीवाला धोका आहे, असं भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले.


या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ आपण रेकॉर्ड केल्याचं सांगत प्रसाद लाड यांनी प्रसार माध्यमांसमोर तो व्हिडीओही दाखवला आहे. राणे यांच्या जीवाला धोका आहे. आता एका मंत्र्याचा व्हिडीओ समोर आलाय. तो मंत्री फोनवरुन पोलीस अधीक्षकांना फोन करुन दबाव टाकताना दिसत आहे, असा आरोपही लाड यांनी केलाय.