पाणीपुरीच्या पाण्यात सापडल्या जिवंत अळ्या; अत्यंत घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार
pani puri : पाणीपुरीमध्ये जिवंत अळी सापडल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात उघडकीस आला आहे. एका ग्राहकाने कॅमेऱ्यात हे सर्व कैद केले आहे.
Latur news : पाणीपुरी म्हणेज जवळपास सगळ्यांचाच आवडता विषय. रस्त्यात, चौकात, नाक्यावर कुठेही पाणीपुरीचा ठेला दिसला की अनेकजण आवर्जून थांबतात आणि पाणीपुरीवर येथेच्छ ताव मारतात. हीच पाणीपुरी तुमची तब्येत बिघडवू शकते. पाणीपुरीच्या पाण्यात जिवंत अळ्या सापडल्या आहते. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. लातूर शहरातील हा किळसवाणा प्रकार आहे.
लातूर शहरातल्या गांधी चौकातील मयूर स्वीट होम नावाचे नामांकित दुकान आहे. मयूर स्वीट होम या दुकानात विविध प्रकारचे खाद्य पदार्थ विकले जातात. या दुकानात पाणीपुरी देखील विकली जाते. अनेक खवय्ये येथे पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी येतात. येथे पाणीपुरी खाण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने दुकानातील अत्यंत किळसवाणा प्रकार उघडकीस आणला आहे.
पाणीपुरीच्या पाण्यात जिवंत अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार एका ग्राहकाने उघडकीस आणला आहे. पाणीपुरी सोबत देण्यात येणाऱ्या पाण्यावर जिवंत अळ्या तिरंगताना दिसला. एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये अत्यंत अस्वच्छ ठिकाणी हे पाणी ठेवण्यात आले होते. हा प्रकार पाहून ग्राहकाला धक्का बसला. या ग्राहकाने सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
प्रसिद्ध दुकानात पाणीपुरीच्या पाण्यामध्ये जिवंत अळी निघाल्याने शहरातील खवय्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ सध्या लातूरमध्ये सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. अद्याप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या पाणीपुरी विक्रेत्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. या दुकानावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. हा अत्यंत घाणेरडा प्रकार असून यामुळे दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पाणीपुरीत दाताचा तुकडा
मध्य प्रदेशात पाणीपुरीच्या पाण्यामध्ये मांसाचे तुकडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मोहसिन मियाँ यांच्या पाणीपुरीत दाताचा तुकडा आढळल्याच्या आरोप एका ग्राहकानं केला. त्यानंतर इतर ग्राहकांनी पाणीपुरी स्टॉलवर गोंधळ घातला. अन्न आणि औषधी विभागाच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत तपासणीसाठी पाण्याचं सॅम्पल घेतलं. तर, पाण्यात असलेल्या मांसाबद्दल कल्पना नसल्याचं पाणीपुरी विक्रेत्यानं सांगितलं.