Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी

Sayali Patil Wed, 27 Mar 2024-7:25 pm,

Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे गटाच्या पहिल्या यादीपासून, विदर्भातील उमेदवारांच्या अर्जांपर्यंत... सर्व राजकीय घडामोडी एका क्लिकवर

Loksabha Election 2024 Live : आगामी लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ सुरु आहे. बारामती मतदार संघात खुद्द सुनेत्रा पवार यांनी गावखेड्यात जाऊन सामान्यांच्या भेटीगाठी सुरु केलेल्या असतानाच आता अजित पवार गटाच्या अंतिम उमेदवार यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तिथं विदर्भात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नावं जाहीर झालेल्या नेतेमंडळींची लगबगही सुरु आहे. तर, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नुकतीच 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 


राज्याच्या इतरही भागांमध्ये अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काय आहेत त्या घडामोडी? इथं पाहा वेगवान अपडेट.... 

Latest Updates

  • महाराष्ट्रातील महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची (Star Campaigner) नेमणूक करण्यात आलेली आहे. शिवसेना शिंदे गटाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महादेव जानकर, रामदास कदम, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, इत्यादी नेत्यांची नावं आहेत. 

  • पुण्यात आरपीआय आठवले गटाची उद्या राज्य कार्यकारणीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले बैठकीला उपस्थितीत राहाणार आहेत. आरपीआय कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा शिर्डीची जागा आरपीआयला सोडावी असा आग्रह आहे. शिर्डीची जागा नाही मिळाली तर कार्यकर्त्यांचा महायुतीबाबत आठवले यांच्यावर वेगळा निर्णय घेण्याचा दबाव. महाराष्ट्रात महायुतीने आरपीआय गटाला एकही जागा दिली नसल्याने कार्यकर्ते नाराज. महाविकास आघाडीमध्ये आंबेडकरांनी जी भूमिका घेतली तीच भूमिका आता महायुतीत आठवले गट घेण्याच्या तयारीत

  • Loksabha Election 2024 Live Updates : अमोल कीर्तीकरांना उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर होताच कीर्तीकरांना ईडीनं समन्स बजावलंय. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीनं बैठक घेतली. `स्वत:ला अमोल किर्तीकर समजून कामाला लागा´ असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांना दिलेत. तर भाजपनं खालच्या पातळीवरचं राजकारण केलं असून उमेदवारी जाहीर झाल्यामुळेच ईडीनं कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : कोण आहेत महायुतीचे स्टार प्रचारक? 

    महाराष्ट्रातील महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या स्टार प्रचारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अशोक चव्हाण, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : माढयात मोहिते पाटील यांचं ठरलं...

    माढयात मोहिते पाटील यांचं ठरलं, धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार असून, भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील राहणार त्याच पक्षासमवेत राहणार असल्याची माहिती जय सिंह मोहिते पाटील यांनी दिली. 

    माढा लोकसभा मतदार संघात अखेर मोहिते पाटील कुटुंबाने रणजीत सिंह मोहिते पाटील वगळता एकमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकीकडे राज्यात भाजपात इन्कमिंग होत असताना मोहिते पाटील यांनी धाडस दाखवत भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाची यादी ही, विजयी उमेदवारांची यादी - अरविंद सावंत 

    'तिसऱ्यांदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी दिली याबद्दल मी  उद्धव ठाकरे आणि आमच्या पक्षाचे सर्व नेत्यांचे आभार मानतो. निवडणुकीमध्ये लढाई लढाई असते मी कधीही कोणाला कमी लेखणार नाही. आमची 17 उमेदवारांची जी यादी जाहीर झाली ती विजयी उमेदवारांची यादी आहे असं मी मानतो', अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली.  

  • Loksabha Election 2024 Live Updates :  राज्यात एकही जागा काँग्रेसची निवडून येणार नाही- धनंजय महाडिक 

    राज्यात काँग्रेसची एकही जागा निवडून येणार नाही. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष भाजप आहे, असं म्हणत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची काँग्रेसवर सडकून टीका केली. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांच्या जीवावर ज्या जागा आल्या ते नेते आता भाजपमध्ये आहेत असंही ते म्हणाले. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : उद्या जाहीर होणार अजित पवार गटाची उमेदवार यादी 

    गुरुवारी आपल्या गटाची उमेदवार यादी जाहीर होणार असल्याची स्पष्टोक्ती अजित पवार यांनी केली. वंचितने काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे पण, मागील वेळेस त्यांच्यामुळं अनेकजण पराभूत झाले होते असं वक्तव्य़ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

  • हेसुद्धा वाचा : UBT First List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! मुंबईतील 4 जागांसहीत 17 जागांवरील उमेदवारांची घोषणा

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : भाजपा मध्ये पडली फूट...

    भंडारा लोकसभा निवडणुकीमध्ये अचानकच एक नवीन वळण आले आहे. भाजपाचे जिल्हा महामंत्री आणि माजी नगरसेवक संजय कुंभलकर हे बसपा तर्फे उमेदवारी अर्ज भरणार असल्याने या निवडणुकीला वेगळी रंगत निर्माण झालेली आहे. सुरुवातीपासून सुनील मेंढे याच विरोध करणाऱ्या भाजपाच्या विरोधकांना कुंभलकर यांच्या निमित्ताने एक सुवर्ण संधी चालून आली आहे. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : भाजपच्या चिन्हावर लढण्यास किरण सामंत यांचा नकार

    रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर लढण्यास किरण सामंत यांचा नकार. संबंधित मतदारसंघ शिवसेनेसाठी अनुकूल असल्याने कोकणात धनुष्यबाण चिन्हावर लढणे अधिक सोयीस्कर असल्याचा सामंत दावा सामंत यांनी केला. भाजपने किरण सामंत यांना भाजपच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती. किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदूर्गमधून इच्छुक असून ते उदय सामंत यांचे भाऊ आहेत. हा मतदारसंघ मिळविण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : उबाठा गटाची यादी जाहीर होताच शरद पवार गटाचा विरोध 

    ईशान्य मुंबई लोकसभा उबाठा कडून संजय पाटील उमेदवार जाहीर झाली. त्यानंतर एनसीपी शरद पवार गटाने विरोध करत घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. एनसीपी कार्यालय येथे घोषणाबाजी शरद पवार पक्ष कार्यालयात बैठक घेत असतानाच महाविकास आघाडी उमेदवार विरोधात घोषणाबाजी करताना दिसले. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर....

    राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर हातकणंगले लोकसभेची जागा ठाकरे गट लढणार असल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे गटाकडून हातकंगले जागेसाठी चेतन नरके आणि माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या नावाची चर्चा सुरु असून, नरके हे गोकुळ संघांचे संचालक आहेत तर सुजित मिणचेकर हे हातकणंगले विधानसभेचे माजी आमदार आहेत. चेतन नरके यांनी दोन दिवसांपूर्वी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. 

    राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचा बाहेरून पाठींबा मागत आहेत तर, राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढावं असं महाविकास आघाडीने सांगितलं आहे. दरम्यान, नरके यांनी कोल्हापूर लोकसभेतून निवडणुक लढवण्याची देखील ईच्छा दर्शवली होती. परंतु शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली असल्याने हातकंगलेमधून उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा दर्शवली आहे. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होणार- फडणवीस 

    देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होणार असून त्यांचे सरसेनापती गडकरी आज अर्ज दाखल करत आहेत. असं सांगताना गडकरी हे राष्ट्रीय नेते असल्याचं म्हणज पुढील पाच वर्षात देशातील गरिबी दूर करू असं आश्वासक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महायुती मोठी झाली. आता घड्याळ आमच्यासोबत विरोधकांचे बारा वाजवू. अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : शिवाजी पार्कवर सभेसाठी मनसे आग्रही 

    लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी आम्ही अर्ज केला आहे, असं मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केलं. आपल्या पक्षाकडून 17  मे साठी अर्ज करण्यात आल्याचं ते म्हणाले. याच तारखेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अर्ज केलेला आहे, असं असलं तरीही प्रचार सभेसाठी पहिला अर्ज केल्यामुळं आम्हालाच परवानगी मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : जे पी गावित अपक्ष उभे राहणार ?

    रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांना निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजची शिरीष चौधरी यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे. जे पी गावित यांना देखील कार्यकर्त्यांसोबत नाशिक मध्ये चर्चा केल्यानंतर दिंडोरी लोकसभेतून उभा राहण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे जे पी गावित अपक्ष उभे राहणार की महाविकास आघाडीचे उमेदवार होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची आज यादी जाहीर होणार? 

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची आज यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. यादी जाहीर होण्यापूर्वी दोन महत्त्वाचे चेहरे शरद पवारांच्या भेटीला आले असून, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असणारे आमदार जे पी गावित शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं म्हटलं गेलं. तर, रावेर विधानसभेचे काँग्रेस आमदार श्री चौधरी देखील शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : अमोल किर्तीकर यांच्या उमेदवारीवरून  संजय निरूपम नाराज

    मुंबई वायव्य मतदार संघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली. पण, त्यांच्या उमेदवारीवरून  संजय निरूपम नाराज असल्याचं म्हटलं जात असून, यासंबंधीची भूमिका ते बुधवारी दुपारी 12 वा. माध्यमांशी संवाद साधतामा मांडणार आहेत. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! 

    महाविकास आघाडीमधील जागावाटपावरुन मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असतानाच आज अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 17 मतदारसंघांमधील उमेदवार उद्धव ठाकरे गटाने जाहीर केले आहेत.

  • Loksabha Election 2024 Live Updates : सांगलीची जागा काँग्रेसला?

    सांगली लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी सांगलीची काँग्रेस प्रतिनिधी आज दिल्लीत जाणार आहेत. माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सोनिया गांधींची घेणार भेट घेणार असून, आमदार विक्रम सावंत,विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे शिष्टमंडळ आज दिल्लीला जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने कॉंग्रेस मध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : नितीन गडकरी दाखल करणार उमेदवारी अर्ज 

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामटेकचे शिवसेनेचे लोकसभा उमेदवार राजू पारवे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असेल. यासोबतच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री श्रीमती सुलेखाताई कुंभारे हे देखील उपस्थित राहतील. जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यापूर्वी नितीन गडकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बख्त बुलंद शहा चौकात चौकात गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील.

  • Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर मनसेची बैठक... 

    लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनसेच्या महायुतीमधील सहभाग,मनसेला देण्यात येणाऱ्या जागा हे मुद्दे चर्चेत असतानाच सकाळी मनसेची बैठक पार पडणार आहे. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link