Maharashtra Breaking News LIVE: अमित शाह महाराष्ट्र दौरा रद्द करुन तातडीने दिल्लीला रवाना
Maharashtra Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावण्याआधीचा आजचा शेवटचा रविवार असल्याने आजचा दिवस हा सभा आणि प्रचाराच्या रणधुमाळीचा आहे. राज्याबरोबरच देशभरातील प्रमुख घडामोडींचे सर्व अपडेट्स अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या; दिवसभरातील ताज्या घडामोडींनी धावा आढावा...
Latest Updates
उद्धव ठाकरेंची बॅग पुन्हा तपासली
कराड विमानतळावर उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी स्वतः बनवला व्हिडिओ.
अमित शाह महाराष्ट्र दौरा रद्द करुन तातडीने दिल्लीला रवाना
गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा तातडीने नागपुरातून दिल्लीला रवाना झाले आहेत. विदर्भातील चार जाहीर सभांसाठी ते काल रात्री नागपुरात दाखल झाले होते. रात्री ते हॉटेल रेडिसन ब्लू येथे मुक्कामी होते. आज नागपुरात काटोल आणि सावनेर येथे तसेच गडचिरोली आणि वर्धा येथे त्यांच्या सभा होणार होत्या. मात्र आज तातडीने महत्त्वाच्या कामाकरता ते नागपूरतून दिल्लीला रवाना झाले.
शरद पवारांची बॅग तपासली; बारामतीतच घडला हा प्रकार
बारामती हेलिपॅडवर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची बॅग तपासण्यात आली आहे. करमाळ्यातील सभेला जात असताना शरद पवारांची बॅग तपासण्यात आली.
'त्या' प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाने काँग्रेस, भाजपाकडे मागितलं उत्तर
निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसकडून निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्यासंबंधी तक्रारींवर उत्तर मागितले आहे. निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून झारखंड, महाराष्ट्र आणि काही उपनिवडणुकांमध्ये त्यांच्या स्टार प्रचारकांनी 'मॉडेल कोड ऑफ कंडक्ट'चे उल्लंघन केल्यासंबंधी असलेल्या तक्रारींच्या उत्तराची मागणी केली आहे. दोन्ही पक्षांना 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत उत्तर पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपाने राहुल गांधीवर त्यांच्या वक्तव्यांद्वारे तरुणांना उत्तेजन देण्याचा आरोप केला आहे, तर काँग्रेसने मोदीवर त्यांच्या भाषणांमध्ये "खोट्या, खलनायकी आणि बदनामीकारक वक्तव्ये" केली असल्याचा आरोप केला आहे.
दर्यापूरमध्ये तुफान राडा; नवनीत राणांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या
अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात भाजप नेत्या नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान मोठा राडा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये 45 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. चार जणांना घेतलं ताब्यात घेण्यात आलं असून राडा करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. प्रचार सभेदरम्यान काही लोकांनी काल खुर्च्यांची फेकाफेक केली होती. नवनीत राणांच्याही अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्या. सध्या खल्लार गावात शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मतदान केल्यावर मिळणार प्रमाणपत्र
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुणे जिल्ह्यात अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यास मतदाराला प्रमाणपत्र मिळणार आहे. मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र ही मतदारासाठी गौरवाची बाब असणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी त्याचा लाभ होणार आहे. मतदारांना मतदानाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी एक क्यूआर कोड तयार करण्यात आला असून त्याचे स्टीकर्स सर्व विधानसभा मतदार संघांना वितरीत करण्यात आले आहेत.
बुधवारी पुणे मार्केट यार्ड राहणार बंद
बुधवारी पुणे मार्केट यार्ड मतदानासाठी बंद राहणार आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील मुख्य बाजारासह उपबाजार बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य बाजारातील फळ-भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग, केळी आणि गुरांचा बाजार, गूळ भुसार विभाग, भुईकाटा केंद्र, पेट्रोल पंप, फूल बाजार, पान बाजार, तसेच मोशी, पिंपरी, मांजरी, उत्तमनगर व खडकी येथील उपबाजार बंद राहणार आहेत.
मुंबईत 80 कोटींची 8476 किलो चांदी जप्त
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान मानखुर्दमध्ये 80 कोटींची चांदी जप्त केली आहे. जप्त केलेली चांदी निवडणूक आयोग आणि प्राप्तिकर विभागाच्या पथकाकडे अधिक चौकशीसाठी सोपवण्यात आलेली आहे. वाशी चेकनाका येथे नाकाबंदीदरम्यान चेन्नईवरून आलेला एक ट्रक तपासण्यात आला ज्यामध्ये ही चांदी होती. जवळपास 8 हजार 476 किलोची ही चांदी असून ती आता तपासली जात आहे.
मुंबईत 3533 मतदारांनी घरातूनच बजावला हक्क
मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मुंबई महापालिका, शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालये विविध उपाययोजना राबवित आहेत. विविध ठिकाणी जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईच्या उपनगरात 4 हजार 349 मतदारांनी गृहमतदानासाठी अर्ज भरला होता. त्यापैकी आतापर्यंत 3 हजार 533 मतदारांनी घरातून मतदानाचा हक्क बजाविला आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर यंत्रणा सज्ज
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवार, 17 नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि सामान्य जनता शिवतीर्थावर येणार असल्यामुळे मुंबई महानगरपालिका, पोलीस तसेच शिवसैनिकांची व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. दर्शनार्थीसाठी मुंबई पोलिसांकडून पुढीलप्रमाणे सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.
प्रियंका गांधी यांचा आज नागपूरमध्ये रोड-शो
काँग्रेच्या नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांचा आज नागपुरात रोड शो होणार आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पश्चिम नागपुरचे उमेदवार विकास ठाकरे आणि मध्य नागपुरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी हा रोड-शो करणार आहे. दुपारी 2 ते 3.30 दरम्यान वाजता प्रियंका गांधी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात अवस्थी चौक ते दिनशॉ फॅक्ट्री चौकपर्यंत त्यानंतर मध्य नागपुरात गांधी गेट ते बडकस चौक असाही त्यांचा एक रोड शो होणार आहे.
महाविकास आघाडीची आज बीकेसीत सभा; उद्धव ठाकरे, शरद पवारांची तोफ धडाडणार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता सभा आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सायंकाळी 5.30 वाजता होत आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीी भाषणं या सभेत होणार आहेत. महाविकास आघाडीकडून 'महायुतीच सरकार चले जाव'चा इशारा दिला जाणार आहे.
गडकरींची रोहित पवारांच्या मतदारसंघात जाहीर सभा
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या आज मुंबईत 2 तर ठाण्यात 2 जाहीर सभा घेणार आहेत. त्यापूर्वी कर्जत-जामखेडमध्ये गडकरी यांची भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी सकाळी 11 वाजता सभा होणार आहे. हा रोहित पवारांचा मतदारसंघ आहे.
शरद पवार आज घेणार 'या' उमेदवारांसाठी सभा
शरद पवारांची सासवड येथे काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप, दौंड येथे रमेश थोरात आणि इंदापूर तालुक्यातील सणसर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. माढा विधानसभा प्रचारासाठी शरद पवार यांची टेंभुर्णी येथे दुपारी बारा वाजता सभा होणार आहे.
उद्धव ठाकरे यांची पाटण येथे सभा
सकाळी 11 वाजता पाटण येथे उध्दव ठाकरे यांची पक्षाचे उमेदवार हर्षल कदम यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली आहे.
अजित पवारांच्या गावांना भेटी आणि दोन सभा
उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी बारामती तालुक्यातील माळेगाव आणि पणदरे गावांचा दौरा करणार आहेत. त्यानंतर शिरूर हवेली येथे सकाळी 11 वाजता न्हावरेमध्ये जाहीर सभेला अजित पवार संबोधित करतील. सायंकाळी पाच वाजता अजित पवारांची फलटणमध्ये जाहीर सभा आहे.
फडणवीसांचा भरगच्च कार्यक्रम
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चार सभा घेणार आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे:
सकाळी 9 वाजता : प्रचार रॅली, एकात्मता नगर, जयताळा बाजार चौक, नागपूर (दक्षिण-पश्चिम नागपूर)
दुपारी 2.45 वाजता : जाहीर सभा, कृषी उत्पन्न बाजार समिती, चांदवड, जिल्हा नाशिक (चांदवड विधानसभा)
दुपारी 4.30 वाजता : जाहीर सभा, अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान, नशिक (नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम विधानसभा)
सायं. 7.45 वाजता : जाहीर सभा, थोरात चौक इचलकरंजी (इचलकरंजी विधानसभा)या शिवाय फडणवीस आज सकाळी साडेनऊच्या सुमारास दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात रोड शोमध्ये सहभागी होतील.
मुख्यमंत्री शिंदेंच्या आज दोन सभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अक्कलकुवा येथे जाहीर सभा होणार आहे. तर सायंकाळी साक्री येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्या सभेला संबोधित करतील.
अमित शाह यांच्या आज 3 सभा
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वर्ध्यात आहेत. त्यांची पहिली सभा गडचिरोली शहरात सकाळी 11 वाजता होणार आहे. दुपारी अडीच वाजता काटोल येथे तर दुपारी तीन वाजता सावनेर येथे अमित शाहांची सभा होईल.
राजकारणातील कट्टर विरोधक एकाच फ्रेममध्ये; शिवडीमध्ये चाललंय तरी काय?
मनसेचे बाळा नांदगावकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अजय चौधरी तुलसी विवाहाच्या निमित्ताने एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. शिवडी विधानसभेत मनसेचे बाळा नांदगावकर विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेच्या अजय चौधरी यांच्यात थेट लढत होत आहे. आम्ही एकमेकांचे विरोधक आहोत, शत्रू नाहीत, असं या भेटीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. यावेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.