Maharashtra Rain LIVE Updates: मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री करणार पाहणी

Thu, 25 Jul 2024-7:21 pm,

Maharashtra Rain LIVE Updates:..तर ठाण्यात मुख्यमंत्र्यांविरोधातही लढेन- राज ठाकरेंच्या शिलेदाराचा हुंकार

Maharashtra Rain Live Updates:  महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पाणी शहरात शिरण्याची शक्यता

Latest Updates

  • Live Update : मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री करणार पाहणी

    मुंबई गोवा महामार्गांवर असणाऱ्या खड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावली होती. 10 ऑगस्ट पर्यत रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 ऑगस्टला मी स्वतः या रस्त्याची पाहणी देखील करणार असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी हे खड्डे मुक्त रस्त्यातून प्रवास करणार का हे पाहावे लागणार आहे. 

  • पुण्यात आज पावसानं हाहाकार केलाय. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड रोडवरील नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय. पुणे जिल्ह्यात बचावकार्यासाठी NDRFच्या 3 टीम तैनात करण्यात आल्यायत. एकता नगर परिसरातील सोसायट्या, रस्ते, दुकानं पाण्याखाली गेलेत. नागरिकांच्या छातीपर्यंत याठिकाणी पाणी आहे. पुणे एकता नगरमध्ये बोटीद्वारे बचावकार्य सुरुय. 

  • मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा

    हवामान विभागाने मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरीकांनी सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मंत्रालय नियंत्रण कक्षाची माहिती. 

  • मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगाच रांगा

    मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे- मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
    मुसळधार पाऊस आणि त्यात महामार्गावर पडलेले खड्डे यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पालघरवरून मुंबई ठाणेकडे जाणाऱ्या वाहनाच्या तीन ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. 

  • Mumbai Rain Update : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, 60 लोकल रद्द

    मुंबईत सकाळपासून सुरु असलेल्या  मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या 60 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु आहे.

  • अलिबागमधील समुद्रात जे एस डब्ल्यू कंपनीचे बार्ज भरकटले

    अलिबाग समुद्रात जे एस डब्ल्यु कंपनीचे बार्ज भरकटले आहे. कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूस भरकटलेले बार्ज उभे आहे.  इंजिन बंद पडल्याने बार्ज भरकटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तहसीलदार विक्रम पाटील घटनास्थळी पोहोचले आहेत. या बार्जमध्ये 14 खलाशी असल्याची माहिती मिळाली आहे. बार्जमधील सर्व खलाशी सुखरूप आहेत. 

  • Rain Live Update : ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपले, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस? 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ठाणे जिल्ह्यात सकाळपासून एकूण 138 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  तर सर्वाधिक पाऊस हा मुरबाड मध्ये पडला आहे. 

    1.ठाणे -  144.6 मिलिमीटर पावसाची नोंद

    2.कल्याण - 128.5 मिलिमीटर पावसाची नोंद

    3.मुरबाड - 212.8 मिलिमीटर पावसाची नोंद

    4.भिवंडी - 112.7 मिलिमीटर पावसाची नोंद

    5.शहापुर- 115.5 मिलिमीटर पावसाची नोंद

    6.उल्हासनगर- 115.8 मिलिमीटर पावसाची नोंद

    7.अंबरनाथ - 119.0 मिलिमीटर पावसाची नोंद

     एकूण पाऊस - 138.1 मिलिमीटर पावसाची नोंद

  • सातारा जिल्ह्यात उद्या रेड अलर्ट, जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

    राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. सातारा जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

  • ...तर ठाण्यात मुख्यमंत्र्यांविरोधातही लढेन- राज ठाकरेंच्या शिलेदाराचा हुंकार 

    राज ठाकरेंनी आदेश दिला तर ठाण्यात मुख्यमंत्री यांच्या विरोधातही लढेन असा हुंकार मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.महायुतीला लोकसभेला मिळालेले यश हे आमच्यामुळे मिळालंय असेही ते पुढे म्हणाले. 

  • राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा

    कोण कुठल्या पक्षात हे काही कळत नाही. राजकीय पक्षांमध्ये न भुतो घमासान होणाराय. काहीजण बाहेरच्या पक्षात जायच्या तयारीत आहेत. रेड कार्पेट घालतो जाण्यासाठी...त्यांचेच काही स्थिर नाही. मी जिल्हावार चार पाच जणांची टीम करून सर्व्हे केला. परत ते आता तुम्हाला भेटतील...त्यांना सांगा सर्व...तिकीट दिले म्हणजे पैसे काढायला मोकळा..अशांना तिकीट देणार नाही.विधानसभा निवडणुकीत मला सत्तेत आपले लोक बसवायचे आहेत हे घडणार म्हणजे घडणार 200 ते 225 जागा आम्ही लढणार आहोत, असे राज ठाकरे म्हणाले.

  • मुसळधार पावसामुळे हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडले 

    रायगडच्या पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत. 6 गेट मधून प्रती सेकंद 3.35 घन मीटर एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून यामुळे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदी पात्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.

  • राधानगरी धरण 100 टक्के भरलं, 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू..

    एकीकडे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली असतानाच राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. सद्या धरण 100 टक्के भरले असून धरणाचा 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा सकाळी 10 वाजता उघडला आहे. या धरणातून प्रति सेकंद 3000 इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे.

  • उजनीत भीमा नदीतून विसर्ग सुरू, धरण रात्रीपर्यंत मायनसमधून येणार प्लसमध्ये

    भीमा खोऱ्यासह पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरले असून इतर धरणं देखील जवळपास भरली आहेत. या धरणांमधून सध्या विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने आता दिलेल्या आकडेवारीनुसार बंडगार्डन मधून एक लाख 5538 क्यसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.आज रात्री 10 वाजेपर्यंत अवघ्या काही तासात दौंड मधुन भीमा नदी पात्रात एक लाख हुन अधिकचा विसर्ग होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

  • मंत्रालयातून राज्यातील पुरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार पुण्याकडे रवाना

    मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून राज्यातील अतिवृष्टी आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्वं करणार आहेत.

  • वर्ध्यात पावसामुळे सिमेंटचा स्लॅब खचला

    वर्ध्यात मुळसधार पावसाने चांगलाच कहर केला आहेय..वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात अतिवृष्टी झाली असून अनेक पूल व विहिरी खचल्या आहेय..अश्यातच वर्धा शहरातील प्रभाग क्रमांक 18 मॉडेल हायस्कूल तारफैल येथील सिमेंटचा स्लॅब खचला यांच्यात कोणतेही जीवितहानी झाली नाही..मात्र हे घर नागरपालिकेकडून घरकुल योजनेत 2010 मध्ये बांधले असल्याची माहिती देण्यात आली.

  • मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय, नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास 

    जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून राष्ट्रीय महामार्ग जात आहे मात्र या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे झाल्याचे पाहायला मिळत आहे मुंबई ते नागपूर जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा खड्डेमय झाल्याचे पाहायला मिळत असून पावसामुळे अनेक ठिकाणी खड्ड्यांचा अंदाज नाल्याने महामार्गावर अपघात झाल्याचे देखील घटना समोर आलेले आहेत जळगाव शहरातील आकाशवाणी चौक इच्छादेवी चौक या महत्त्वाच्या चौकांमधून मोठ्या प्रमाणावर शहरातील नागरिकांची वाहतूक सुरू असते त्याच ठिकाणी मोठे खड्डे पडलेले असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रोज नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे माहिती समोर आली असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर भरून देखील चांगल्या सुविधा मिळत नसतील तर काय फायदा असा संतप्त सवाल विचारला जातोय. 

  • मावळ आणि मुळशीतील पर्यटन स्थळांवर 4 दिवस बंदी असणार आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय.

  • जेष्ठ साहित्यिक तथा विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वसईत नंदाखाल येथे राहत्या घरी निधन !

    मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक व विचारवंत,तथा हरित वसईचे प्रणेते वसई धर्मप्रांता तले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वसईत नंदाखाल येथे राहत्या घरी गुरुवार 25 जुलै 2024 पहाटे 6 वाजता निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज गुरुवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) त्यानंतर 4 वाजेपासून पवित्र आत्म्याचे चर्च, नंदाखाल येथे अंत्यदर्शन घेता येईल. तर त्यांचा अंत्यविधी मिस्सा - विधी गुरुवार 25 जुलै 2024 रोजी, संध्याकाळी 6 वाजता पवित्र आत्म्याचे चर्च, नंदाखाल येथे होईल.अशी माहिती बिशप हाऊस वसईचे फादर बर्नाड फर्नांडिस यांनी दिली. फादर दिब्रिटो यांच्या निधनाने एकूणच साहित्य जगतावर शोककळा पसरली आहे

  • उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन 

    मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना परस्पर समन्वय व सहकार्य ठेवून बचत व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले. बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. एनडीआरएफ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांचीही मदत तातडीने उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आपत्तीग्रस्त नागरिकांच्या निवारा व अन्नधान्याची सोय करावी. राज्य प्रशासन तसेच राज्य आपत्ती निवारण यंत्रणेने जिल्हा यंत्रणांशी संपर्क ठेवून परस्पर समन्वय व सहकार्याने काम करावे. नागरिकांसाठी बचाव व मदत तात्काळ पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही अतिवृष्टी व पुरापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनीही नागरिकांना सक्रिय मदत करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

  • रायगड ताम्हिणी घाटात कोसळली दरड, एकाचा मृत्यू

    माणगाव पुणे रस्त्यालगत असलेल्या धाब्यावर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. ही दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. दरड बाजूला करण्यास आणखी 4 ते 5 तास लागणार आहेत. दरम्यान माणगाव पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ताम्हिणी घाटात आधारवाडी गावाजवळ ही दरड कोसळली.

  • उल्हास नदीने ओलांडली इशारा पातळी

    उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कल्याण नगर मार्गावरील रायते पुलाला नदीचे पाणी लागले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उल्हासनदीच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे.उल्हास नदीची पातळी वाढल्यास कल्याण नगर मार्गावरील रायते पुलावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. 

  • चालत्या बसमध्ये पाण्याची गळती 

    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला घरघर लागली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये महामंडळाकडून सुरू असलेल्या बस या अक्षरशः चालते फिरते सांगाडे झाले आहेत. नंदूरबार आगारातील चालत्या बसमध्ये पाण्याची गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशांना अशाच बस मध्ये प्रवास करावा लागला. छतावरून पाणी गळत असल्याने बसमध्ये पाणीचं पाणी झाले होते. कलमाडी ते नंदुरबार प्रवासादरम्यान सुरु असलेल्या या बस मध्ये गळती लागली होती. विद्यार्थी विद्यार्थिनींचा 15 किलोमीटर उभा राहून प्रवास करण्याची वेळ या बस मुळे आली. बैठकीच्या ठिकाणी पाणी असल्याने सीटवर बसून विद्यार्थ्यांच्या प्रवास करता आला नाही.

  • अंबाडा येथील शेतकऱ्यांनी मागितली आत्मदहनाची परवानगी

    वरुड तालुक्यातील अंबाडा इंदूर हा पानंद रस्ता जून 2024 मध्येच तयार करण्यात आला मात्र हा रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच 23 जुलै रोजी तहसीलदार यांच्या आदेशाने हा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे यामुळे शेतीची कामे ठप्प झाली शेतीचे काम करणे कठीण झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. हा रस्ता पूर्ववत दुरुस्त करून द्यावा अन्यथा शेतकऱ्यांना आत्मदहनाची परवानगी द्यावी अशी मागणी अंबाडा येथील शेतकरी सर्वेश ठाकरे, योगेश कानफाडे, नितीन खंडस्कर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

  • पुढील 24 तासात मुंबई-उपनगरात मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज 

    पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आला आहे. यावेळी वारे ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. 

  • कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

    कल्याण डोंबिवलीत कल्याण ग्रामीण परिसराला काल पावसाने चांगलच झोडपून काढल होतं. रात्री मुसळधार पाऊस सुरु होता. पहाटे पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र अर्ध्या तासापासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. यामुळे स्टेशन परिसरात पाणी साचायला सुरवात झाली आहे.

  • खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग 

    हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.

  • शेतकऱ्यांना विम्याचा लाभ 

    पीक विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख 98 हजार 552 शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. आमदार डॉ संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी व विमा कंपन्यांची बैठक घेतली. त्यात आर्णी केळापूर घाटंजी सह जिल्ह्यातील अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांना 43 कोटी 65 लाख 75 हजार रूपये अदा करण्याचा आदेश झाला.

  • महाडमध्ये सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी 

    सावित्री नदीचे पाणी शहरात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर पालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केले आहे. पाली येथील अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी साचंलय. यामुळे खोपोली वाकण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अंबा, सावित्री , कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ , कर्जत , खालापूर भागात जोरदार पाऊस नेरळ ते दहीवली पुलावरून पाणी वाहू लागले,पुल वाहतुकीसाठी बंद आहे. रोहा ते कोलाड मार्गावर पाणी साचलं आहे.

  • पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने नागरिकांची तारांबळ 

    खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड रोडवरील नदीकाठच्या सोसायत्यांमध्ये पाणी शिरलय.  एकता नगर परिसरातील पाच ते सहा सोसायट्या, रस्ते, दुकानं पाण्याखाली गेले आहेत. मध्यरात्री लोक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सोसायटीमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याबाबतची कुठलीच पूर्व सूचना प्रशासनातून देण्यात आली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अचानकपणे पाणी वाढल्याने 200 पेक्षा जास्त लोक अडकले होते. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलं आहे. दरम्यान सध्या खडकवासला धरणातून 35000 क्यूसेक्स ने पाणी सोडण्यात येत आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा विसर्ग रात्रीतून चौपट करण्यात आला आहे. त्यात आवश्यकतेनुसार घट किंवा वाढ होऊ शकते असं पाटबंधारे विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

  • पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश 

    हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.

  • रायगडच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस

    रायगडच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा , पोलादपूर तालुक्यातील शाळा , महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.अंबा, सावित्री कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान रायगड जिल्हा प्रशासनाकडू नागरिकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link