Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

Swapnil Ghangale Sun, 18 Aug 2024-7:58 pm,

Maharashtra Breaking News LIVE: राजकीय घडामोडी, दैनंदिन अपेड्टससहीत महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावा आढावा आणि संक्षिप्त स्वरुपातील अपडेट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता...

Latest Updates

  • पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

    पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. हडपसर या भागात रस्त्यावर पाणी साठल्याने अनेक वाहने पाण्यात अडकल्याचं चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तर काही ठिकाणी झाडे पडण्याच्या ही घटना घडल्या आहेत. 

  • अजित पवारांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस गुलाबी जॅकेट घालून कार्यक्रम स्थळी

    लाडकी बहीण योजनेवरून रंगलेला श्रेयवाद आणि उद्याच्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ कार्यक्रम सुरू झाला आहे. यावेळी अजित पवारांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रम स्थळी गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसले. 

  • सरडा, ढेकूण म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का? अजित पवारांचा सवाल

    सरडा आणि ढेकूण म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना विचारला आहे. अजित पवारांनी गुलाबी रंगाला आपलंसं केलं. यावरून सरडा ही रंग बदलतो अशी खोचक टीका शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी केली होती. त्याला उत्तर देताना अजित पवारांनी हा सवाल उपस्थित केला. कोण आम्हाला शिव्या देतंय, कोण आम्हाला शाप देतंय तर कोण कोणाला सरडा म्हणतंय अन कोण कोणाला ढेकूण म्हणतंय. पण यामुळं राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का? राज्याचा कायापालट होणार आहे का? याचं उत्तर विरोधकांनी द्यावं, असं आवाहन अजित पवारांनी केलं. जनसन्मान यात्रेदरम्यान पुण्यातील आंबेगाव विधानसभेत अजित पवारांनी विरोधकांवर असा निशाणा साधला

  • पोलीस पुत्राचा हवेत गोळीबार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं गुन्हा दाखल

    पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो हातात रिवॉल्वर घेवून हवेत गोळीबार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तीन वर्षापूर्वीचा असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  • '17 ऑगस्ट हा दिवस लाडकी बहीण दिन म्हणून साजरा करूया'

    "सरकार पडेल असं विरोधक म्हणत होते पण सरकार मजबूत होत गेलं त्यामुळे महिला बहीणींच्या खात्यात पैसे जमा झाले.  आपल्या सहकार्यामुळे ही योजना यशस्वी झाली आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार आहे. पुन्हा सरकार आल्यास दीड हजाराचे तीन हजार करू. लखपती झालेली बहिण पहायची आहे. अनेक महिलांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते. विरोधक हे सावत्र भाऊ यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा, हाच खऱ्या आर्थाने माहेरचा आहेर आहे. दर महिन्याला ही ओवाळणी आहे. विरोधकांना लाज वाटली पाहिजे. विरोधकांमध्ये मळमळ, जळजळ झाली तरी त्यांना शंभूराज देसाई त्यांना जमाल गोटा देतील. 17 ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन म्हणून आपण साजरा करूया. विरोधकांना खायला कांदी पेढे पाठवा," असं मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यामधील लाडकी बहीण लाभार्थींच्या कार्यक्रमातील भाषणात म्हणाले.

  • सर्वात सुपर डूपर हिट कार्यक्रम म्हणजे लाडकी बहीण योजना : मुख्यमंत्री शिंदे

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यामधील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कार्यक्रमात जाहीर भाषण केलं. यावेळी त्यांनी, "महिलांचा महासागर आज पहायला मिळाला. साताऱ्यात कार्यक्रम झाला याचा एक वेगळा आनंद आहे कारण ही माझी जन्मभूमी आहे," असं म्हटलं. पुढे बोलताना, "आम्ही भाग्यवान आहोत कारण आपल्या सारख्या बहिणी मला मिळाल्या. कोट्यवधी बहिणी मला मिळाल्या. हा सर्वात सुपर डूपर हिट झालेला कार्यक्रम आहे," असंही मुख्यमंत्री म्हणाले. "कालच या लाडकी बहीण योजेनेची सुरुवात झाली आहे. 3 हजार कोटी महिला भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत," असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी या योजनेसाठी राज्य शासनाने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सांगितलं आहे.

  • उदयनराजेंची लाडक्या बहिणींकडे पाठ? चर्चांना उधाण

    माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपुर्ती कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले अनुपस्थित आहेत. उदयनराजे भोसले कार्यक्रमात उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. नक्की कशामुळं उदयनराजे अनुपस्थित आहेत याबाबत चर्चा सुरु आहेत.

  • मराठा आरक्षणावरुन संभाजी भिडेंचा आंदोलकांना सवाल! म्हणाले, 'आरक्षण कुठे घेऊन...'

    संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातही भाष्य केलं आहे. सांगलीमधील पत्रकार परिषदेमध्ये, "मराठा आरक्षण कळीचा मुद्दा आहे. पण वाघ आणि सिंहाने मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचं आहे. आरक्षण कुठे घेऊन बसलाय?" असं विधान संभाजी भिडेंनी केलं आहे. मागील काही काळापासून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून मराठा आंदोलक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेताना दिसत आहेत.

  • 25 ऑगस्टला सांगली बंदची हाक; संभाजी भिडेंची घोषणा

    बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात 25 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार, अशी घोषणा शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. सांगलीमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

  • राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असते तर...; राऊतांचं विधान

    उद्धवजींच्या भूमिकेनुसार चेहरा असलेला बरा. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी असते तर लोकसभेत चित्र वेगळे असते, असं संजय राऊत नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. 

  • जोपर्यंत क्रूर शक्ती आम्ही गाडत नाही तोपर्यंत...; नागपूरमधून राऊतांचा एल्गार

    नागपूर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी पोहचून पत्रकारांशी संवाद साधला. विदर्भात 50 ते 55 जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.  20-21 तारखेला जागांबाबत बैठक होईल, असंही त्यांनी सांगितलं. जोपर्यंत क्रूर शक्ती आम्ही गाडत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, असं राऊत म्हणाले. प्रत्येकावर ठरवून अत्याचार झाले हे ते आणीबाणी पेक्षा वाईट होते 

  • मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यात 50 हजार 'लाडक्या बहिणींच्या' उपस्थिती लाभार्थ्यांसाठी कार्यक्रम

    लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा कार्यक्रम थोड्याच वेळात साता-यातील सैनिक स्कुल मैदानावर सुरु होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मंत्री शंभूराज देसाई हे उपस्थित असणार आहेत. जवळ जवळ 50 हजार महिला उपस्थित राहतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 'अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यांबद्दल देवेंद्र फडणवीसांनी करावा खुलासा'

    'जन सन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा. आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत देवेंद्रजींनी तात्काळ खुलासा करावा,' असं ट्वीट अजित पवार गटाचे विधान परिषदेचे खासदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

  • पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज जालन्यात

    शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे येत आहे. जयंत पाटील, सुप्रिया सुळे, राजेश टोपे, अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. हे सर्व नेते संध्याकाळी 5 वाजता भोकरदनमध्ये सभा घेणार आहेत.

  • दाभोलकर खटला : सीबीआयला दाभोलकर कुटुंबीयांची विनंती

    पुणे सत्र न्यायालय 10 मे रोजी लागला होता. पुराव्या अभावी तिघांची दोषमुक्त करण्यात आलं होतं. शंभर दिवस उलटून गेले तरीही सीबीआयने आरोपीच्या निर्दोष विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलेले नाही. सुटकेच्या विरोधात दाभोळकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केला आहे. सीबीआयकडून मात्र अजून उच्च न्यायालयात अपील दाखल न केल्याने दाभोलकर कुटुंबाकडून विनंती करण्यात आली आहे. हायकोर्टात तात्काळ अपील करा अशी विनंती दाभोलकर कुटुंबीयांनी सीबीआयला निवेदनाद्वारे केली आहे.

  • राज्यात पावसाचा इशारा...

    पावसाने दडी मारल्यानंतर राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, उकाड्याने घाम निघत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (तारीख 18 ऑगस्ट 2024 रोजी) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

  • भोकरमध्ये हाकेंच्या उपस्थितीमध्ये ओबीसी मेळावा

    प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत भोकरमध्ये ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10 च्या सुमारास भोकर या तालुक्याच्या शहरातून ओबीसी रॅली निघणार आहे. त्यांनतर सकाळी 11 वाजता ओबीसी मेळावा होणार आहे.

  • पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक कसा असेल?

    कुठे : सांताक्रूझ – गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    कधी : रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत

    परिणाम : ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, काही लोकल रद्द करण्यात येतील. तर, हार्बर मार्गावरील अंधेरी, बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येतील.

  • हार्बर मार्गावरील आजचा मेगाब्लॉक कसा?

    कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रेदरम्यान

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत

    परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी – कुर्लादरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

  • मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आज मेगाब्लॉक

    विविध अभियांत्रिकी कामे, रेल्वे मार्ग, सिग्नल प्रणाली आणि इतर उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉक कसा असेल ते पाहूयात...

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ठाणे – दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर आज ब्लॉक असेल

    कधी : रविवारी सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत

    परिणाम : सकाळी 9.46 सीएसएमटी – बदलापूर, सकाळी 10.28 सीएसएमटी – अंबरनाथ, दुपारी 2.42 सीएसएमटी – आसनगाव, दुपारी 3.17 कल्याण – सीएसएमटी दरम्यान जलद लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच या लोकल नियोजित थांब्यासह कळवा, मुंब्रा, दिवा येथे थांबतील. सकाळी 9.50 वाजताची वसई रोड – दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकल रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी 11.45 वाजताची दिवा – वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल. दुपारी 12.55 वाजता वसई रोड – दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येईल. दुपारी .245 वाजता दिवा – वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येईल. रत्नागिरी – दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे स्थगित करण्यात येईल.

  • '...तर मोदींनी नोटांवर स्वत:चा फोटो लावला असता; तिरंगा बदलला असता'

    "भारताने आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. बहुमत गमावलेले आपले पंतप्रधान श्रीमान मोदी यांनी तरीही लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला, ज्या तिरंग्यास त्यांच्या मार्गदर्शक संघटनेचा विरोध होता. या वेळी मोदी यांनी 400 जागा खरोखरच जिंकल्या असत्या तर त्यांनी तीन गोष्टी नक्कीच घडवून आणल्या असत्या," असं म्हणत टीका करण्यात आली आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त.

  • नितेश राणेंचा आज इंदापूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा

    भाजपाचे आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत इंदापूरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन. राणेंची आज दुपारी 12 वाजता इंदापूर नगरपरिषद मैदानात सभा. मात्र आमदार नितेश राणेंना इंदापुरात येण्यास काही राजकीय नेत्यांसह सकल मराठा युवकांचा तीव्र विरोध आहे.

  • असा आहे अजित पवारांचा आजचा दौरा

    सकाळी साडेदहा वाजता जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बस स्थानक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन व स्वागत केलं जाईल त्यानंतर 14 नंबर येथे बेनके फार्म हाऊसमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम सकाळी आकरा वाजता पार पडणार आहे. शिरूर - हवेली विधानसभा क्षेत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये जन सन्मान यात्रेनिमित्तची सभा सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. 

  • जुन्नरमध्ये आज अजित पवारांची सभा

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी जुन्नरमध्ये विविध कार्यक्रम आणि बैठका आहेत.  आंबेगाव विधानसभा क्षेत्रात अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जन सन्मान यात्रेनिमित्तची सभा दुपारी 1 वाजता होणार आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जुन्नर तालुक्यातील निलायम गार्डन मंगल कार्यालयात हॉस्पिटॅलिटी व पर्यटन संदर्भात विविध बैठका होणार असून सकाळी 8.30 वाजल्यापासून बैठकींना सुरुवात होणार आहे.

  • परळच्या महाराजाचे आगमन

    गणेशोत्सवाला अजून 20 दिवस बाकी असले तरी मुंबईत आतापासूनच मोठमोठ्या गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचा आगमन सोहळा होत आहे. शनिवारी परळ येथील महाराजा गणपतीचा आगमन सोहळा थाटात पार पडला. ढोल-ताशा, डीजेच्या गजरात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हा आगमन सोहळा पार पडला. गणेशाची शुभकाशी ही मूर्ती असून नरकासुराच्या वध करत असलेली गणेशाची आणि शंकराची भव्य मूर्ती आहे. आतापासून गणेशाची मूर्ती मंडपात नेल्यानंतर पुढे सजावट करावी लागते त्यामुळे 15 ते 20 दिवस आधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आपल्या गणेश मूर्ती घेऊन जातात.

  • बांगलादेशमधील हिंदूंना हवी ती मदत करण्यासाठी भारत सरकार तत्पर

    बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या घटनाक्रमावरून, त्या ठिकाणी असलेल्या हिंदूंना मदत दिलीच पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे. भारत सरकार त्या दृष्टीने सर्व काही पावलं उचलत असल्याचची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी परभणीत दिली. मंत्री श्रीपाद नाईक हे परभणी येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर दिले. बांगलादेश मधील हिंदूंना लागेल ती मदत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी काम करत असल्याच त्यांनी म्हटलं आहे.

  • अजित पवारांच्या बैठकीवर शिंदे गटाचा बहिष्कार; कारण ठरली 'लाडकी बहीण'

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज होणाऱ्या आंबेगाव - शिरूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या बैठकीवर शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या 'जन सन्मान' यात्रेत ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'' या योजनेचे नाव बदलून '''माझी लाडकी बहीण''' असं नामकरण करून प्रचार व प्रसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने करण्यात येत असल्याने आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत महायुतीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. राज्यात महायुती असतानाही आंबेगाव शिरूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री या नावाला बगल दिली जात असल्याने शिवसैनिकांनी नाराज होऊन आजच्या कार्यक्रमावर आणि बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link