राज्यात जास्त थकबाकी असलेल्या भागांत भारनियमन - ऊर्जामंत्री
विजेचा तुटवडा, राज्यात अघोषित भारनियमन
चंद्रपूर : राज्यात तीन हजार मेगवॅट वीजेचा तुटवडा आहे. जास्त थकबाकी असलेल्या भागांमध्येच भारनियमन करण्यात येत असल्याचा दावा ऊर्जामंत्र्यांनी केलाय. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना भारनियमनाचा फटका बसलाय.
राज्यात ३ हजार मेगावॉट विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अघोषित भारनियमन सुरू केलंय. मात्र तीस टक्क्यांपेक्षा कमी वसुली असलेल्या भागात भारनियमन करण्यात येणार असल्याचा दावा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. वीज बिलाचे 35 हजार कोटी रुपये थकीत आहे, अशी माहिती त्यांनी दिलेय.
चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे. त्यातच मार्च एप्रिल मे महिन्यासाठी कोयना धरणातील वीज उपलब्ध व्हावी म्हणून सध्या कोयनेतील 1500 मेगावॅट वीज निर्मिती बंद आहे. ऑक्टोबर हिट, कृषी पंप उपसा आणि सणासुदीमुळे विजेच्या मागणीत वाढ झालीय.
या भारनियमनाच्या फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनाही बसला. आज कार्यक्रम असल्याने हे नेते सोमवारी औरंगाबादमध्ये दाखल झाले आणि शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला गेले. मात्र रात्री त्या ठिकाणची वीज गेली आणि निम्मी रात्र या नेते मंडळींना अंधारात काढावी लागली. वाढलेल्या उकाड्याचा त्यांना चांगलाच त्रास झाला. अखेर रात्री खूप उशिरा वीज आल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला.