अनिरूद्ध दवाळेसह श्रीकांत राऊत / अमरावती : आतापर्यंत कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या झपाट्याने कमी होत चालली होती. मात्र आता पुन्हा एक नवं संकट समोर येऊन ठाकले आहे. यामुळे सगळ्यांच्याच चिंतेत भर पडली आहे. विदर्भातील (Vidarbha) अमरावती, (Amravati) यवतमाळ (Yavatmal) या जिल्ह्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता अधिक आहे. तर वर्धा जिल्ह्यात (Wardha District) शनिवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कर्फ्यू (Curfew) जाहीर करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत शाळा-महाविद्यालय बंद राहणार आहेत. (Lockdown again in Amravati, Yavatmal, Wardha district?)


शाळा-महाविद्यालय पुन्हा बंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्धा जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार केवळ मेडिकल स्टोअर आणि तातडीच्या सेवांशी संबंधित लोकांनाच कर्फ्यूमध्ये फिरण्याची परवानगी असणार आहे. याशिवाय सर्व काही बंद होईल. यावेळी सरकारने पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. वर्धा जिल्हाधिकारी  प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले की, कोरोना विषाणूची वाढती घटना लक्षात घेता पुढील सूचना येईपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा कोरोनाचा नवा विषाणू अँटीबॉडीजनाही चकवा देत असल्याचं उघड झालं आहे. राज्यात 24 सँपल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं होतं. अमरावती, यवतमाळ आणि साताऱ्यातून प्रत्येकी चार आणि पुण्यातून 12 सँपल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले होते. यापैकी अमरावती, यवतमाळ आणि सातारा जिल्ह्यातून आलेल्या सँपल्समध्ये वेगळं म्युटेशन आढळलं. अमरावतीत E484K हे म्युटेशन आढळले. यवतमाळमधील सँपल्समध्ये N440K हे आंध्रप्रदेशात आढळणारे म्युटेशन सापडले आहे. हे दोन्ही प्रकार अँटीबॉडीजना चकवा देतात. तर साताऱ्याच्या सँपल्समध्ये V911I ((911 नंतरचं अल्फाबेट हे इंग्रजी आय आहे))  हा नवा प्रकार आढळला आहे. मात्र याचे फारसे रेफरन्सेस आढळत नाहीत.  



विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन अध्यक्ष डॉ. अशोक अरबट यांनीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान अमरावतीतील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबदल जिल्हा आरोग्य यंत्रणेला माहितीच नसल्याचे समोर आले आहे. अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक श्याम सुंदर यांनीही कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात आढळणाऱ्या A2 टाईपचेच हे कोरोनाचे प्रकार आहेत. ब्रिटन, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकाचे स्ट्रेन या सर्व 24 सँपल्समध्ये आढळलेले नाहीत.