जळगाव : कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉक डाऊन करण्यात आले . मात्र अनेकांसाठी हा काळ आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यातना दायी ठरला. अशाच प्रकारे बुलढाणा येथील शबाना बी सलमान खान या महिलेला लॉक डाऊनमुळे  जळगावमध्ये  फुटपाथवर राहण्याची वेळ आली. शबाना बी सलमान खान मुलाच्या उपचारासाठी  लॉकडाऊनपूर्वीच जळगावात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शबाना बी सलमान खान ही महिला मूळची बुलढाणा येथे राहणारी. दारूच्या व्यसनामुळे ४ महिन्यापासून शबाना आपल्या पतीपासून पाच वर्षाच्या जुळ्या मुलांसह वेगळी राहते. मुलाला त्वचारोग उद्भवल्याने व परिस्थिती जेमतेम असल्याने  उपचाराकरता शबाना आपल्या मुलाच्या उपचाराकरता २४ मार्चला बुलढाणाहून जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात आली. मात्र त्यानंतर लॉकडाऊन झाले. 


जिल्हा रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव करण्यात आले. त्यामुळे इतर रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. लॉकडाऊनमुळे गाड्या बंद . जळगावात कोणी नातेवाईक किंवा परिचित नाही त्यात पाच वर्षाच्या दोन जुळ्या मुलासह व सहावा महिना गर्भाशी असलेली शबाना समोर मोठे संकट उभे राहिले. अखेर परिस्थितीमुळे लाचार झालेली शबानाने आपल्या दोन मुलांसह फूटपाथचा सहारा घेत दोन महिन्यापासून शबाना आजूबाजूच्या दात्याकडून मिळेल त्यावर आपला व आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करत आपल्या घरी जाण्याची वाट पाहू लागली. 


अशातच गेल्या चार दिवसांपूर्वी शबाना ला रात्रीच्या सुमारास प्रसूती कळा सुरु झाल्या. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावरही शांतता होती. मात्र शबाना चा त्रास अधिक वाढू लागला. शबाना तळमळत असल्याचे फूटपाथ वर असलेल्या एका दीन दुबळ्या महिलेला लक्षात आले. या महिलेने शबानाला मदत करत महानगरपालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात शबानाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.  



याबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली यावरून शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विठ्ठल ससे व निर्भया पथकातील निरीक्षक मंजुला तिवारी यांनी आपल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून शबाना व तिच्या बाळाची तपासणी करून उपचार करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने तात्काळ उपचार मिळाल्याने शबाना व तिचे बाळ सुखरूप आहे. स्थानिकांच्या व पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेत द्वारे शबानाला आर्थिक मदतीसह बुलढाणा तिच्या मूळ गावी रवाना करण्यात आले.