Lockdown : बदलापुरात 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन, उद्या खरेदीची मुभा
बदलापूरमध्ये लॉकडाऊनची घोषणा
बदलापूर : करोनाची साखळी तोडण्यासाठी बदलापूर पालिक प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात करोना रुग्णांची वाढत असलेली संख्या आणि त्यामुळे आरोग्य व्यावस्थेवर पडणार ताण यामुळे करोना संसर्गाची साखळी तोडण्यास पालिका प्रशासनाला यश येत नाहीये. त्यामुळे बदलापूर शहरातही कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
शनिवारपासून बदलापूर शहरात कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. पालिका प्रशासन, पोलीस, सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, आमदार किसन कथोरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवेखाली दररोज नागरिक रस्त्यांवर गर्दी करत होते. ही होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी सांगितलं
शहरात आठ दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. उद्या शुक्रवारी नागरिकांनी अत्यावश्यक बाबींची खरेदी करून ठेवावी असे आवाहनही मुख्याधिकारी पुजारी यांनी केले आहे. लॉकडाऊन काळात शहरातील नागरिकांना अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडता येणार नाही. तसंच अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानेच या काळात सुरू राहतील. निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.