अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांनी टोळधाडीपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतात बँड आणि फटाके वाजवावेत. फटाक्याच्या धुराने टोळ पिकांच्या जवळपास फिरकणार नाहीत, असा सल्ला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिला. त्यांनी शनिवारी नागपूर जिल्ह्यातील टोळधाडीने नुकसान केलेल्या भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगितले. तसेच शेतकऱ्यांनीही सतर्क रहावे, अशी सूचना त्यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या टोळधाडीचे काय आहे व्हायरल वास्तव?

टोळधाडीने काटोल तालुक्यातील कचारी सावंगा, सोनपुर, गणेशपुर, शेकापुर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ही माहिती मिळताच गृहमंत्र्यांनी रात्री साडेनऊ वाजता टोळधाड असलेल्या भागात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना  तातडीने फवारणी तसेच योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.



जेणेकरून टोळधाडीपासून शेतकऱ्यांचे पीक,फळबागा, भाजीपाला वाचू शकेल वा कमीत कमी नुकसान होईल. शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी सुद्धा टोळधाड पासून बचाव करण्यासाठी बँन्ड,फटाके याचे मोठे आवाज करावेत. मोठ्याप्रमाणात धूर करावा  त्यामुळे ही टोळधाडी पासून आपण बचाव करू शकतो, असेही देशमुख यांनी सांगितले.  नुकसानीची पाहणी करताना त्यांच्यासोबत कृषी विभाग महसूल विभाग सोबतच स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.