चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : भाजप पदाधिकाऱ्याने बूथप्रमुखांना पैसे देण्याचे आमिष दाखवल्याचा प्रकार उल्हासनगरात समोर आला आहे. जमनू पुरस्वानी असे या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव असून ते उल्हासनगर महापालिकेत भाजपचे सभागृह नेते आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी काही दिवसांपूर्वी उल्हासनगरात मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात भाषण करताना जमनू पुरस्वानी यांनी बूथप्रमुखांना उद्देशून एक वादग्रस्त वक्तव्य केले. मतदानाच्या दिवशी तुमच्या बुथवर प्रतिस्पर्धी उमेदवाराला शून्य मते पडली, तर तुम्हाला प्रत्येकी ११ हजार रुपयांचे बक्षीस देऊ, असे पुरस्वानी म्हणाले. या वक्तव्याने पुरस्वानी यांनी स्वत:वर वाद ओढवून घेतला. तसेच विरोधकांनाही या वक्तव्याने आयतं कोलीत मिळाले.



पुरस्वानी एवढेच बोलून थांबले नाहीत. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते तुमचा सत्कार करू, असे आश्वासनही त्यांनी देऊन टाकले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हॉट्सऍपवर व्हायरल झाला असून याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मतदान आपल्या बाजूने करण्यासाठी अशाप्रकारे पैशाचं आमिष दाखवणं हे आचारसंहितेचं उल्लंघन असून याप्रकरणी पुरस्वानी यांच्यावर कारवाई करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता महेश तपासे यांनी केली आहे. त्यामुळे पुरस्वानी हे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.