नाशिक: मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम यंत्रामध्ये फेरफार केले जातील, या भीतीने नाशिकमधील अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी मतमोजणी केंद्राबाहेर खासगी सुरक्षारक्षक तैनात केल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये असलेल्या माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरी केली होती. युती होणार नसल्याचे गृहीत धरुन त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती. पण ऐनवेळी युती झाल्याने कोकाटेंना माघार घेण्यास सांगण्यात आले. मात्र, पक्षादेश न मानता कोकाटे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. त्यामुळे नाशिक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील लढत चुरशीची होणार, असा सगळ्यांचा अंदाज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता मतदान झाल्यानंतर माणिकराव कोकाटे कोणताही धोका पत्कारायला तयार नाहीत. त्यासाठी कोकाटे यांनी स्वखर्चाने ईव्हीएम यंत्रे असलेल्या स्ट्राँग रुमबाहेर खासगी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. आपल्याला सरकारी सुरक्षेवर विश्वास नाही. या निवडणुकीसाठी माझ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली होती. त्यांचे हे श्रेय हिरावून घेतले जाऊ नये, यासाठी हे पाऊल उचलल्याचे कोकाटेंनी सांगितले. 



भिवंडीत स्ट्राँगरुमबाहेर होमहवन


भिवंडीत ईव्हीएम यंत्रे ठेवलेल्या शाळेबाहेर एका इनोव्हा कारमध्ये चक्क होमहवन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदानयंत्रात हेराफेरी करण्यासाठी होमहवन सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला. मात्र, शाळेत सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी होमहवन होत असल्याचा दावा येथील कर्मचाऱ्याने केला आहे.