चौथ्या टप्प्यातही मतदान यंत्र बिघडण्याची समस्या कायम
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली.
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदार संघाच्या बाहेर रांगा पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा आज मतदार पेटीत बंद होणार आहे. पण चौथ्या टप्प्यातही मतदान यंत्र बिघडण्याची समस्या कायम राहिली आहे. मतदान सुरू होताच नाशिकच्या विहितगाव केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. मतदान केंद्र क्रमांक १०७ मधील यंत्रणा बिघडली. याच केंद्रावर युतीचे उमेदवार हेमंत गोडसे मतदान करणार आहेत. तर धुळ्यातही गरताड मतदान केंद्रावर यंत्रणा बिघडली काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचं इथे मतदान होतं. दरम्यान नाशिकमध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर पोलिंग एजंटला जाऊ न दिल्याने वाद निर्माण झाला आणि उमेदवार समीर भुजबळ यांना इथे यावं लागलं. ओळखपत्रावरून पोलिसांशी त्यांचा वाद झाला.
कोल्हेंचे मतदान
शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सपत्नीक मतदान केले. नारायणगाव इथल्या कोल्हे मळ्यात जिल्हा परिषद शाळेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शिरुरमध्ये इतिहास घडवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तसेच उन्हामुळे मतदानाचा टक्का वाढवणे कठीण जाणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
सेल्फी पॉईंट
नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. संवेदनशील केंद्रांवर ती विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक मतदारसंघांमध्ये सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी मतदारांसाठी सेल्फी पॉईंटही निर्माण करण्यात आलेला आहे . सकाळच्या सुरुवातीच्या टप्प्यात मतदानाला संमिश्र प्रतिसाद आहे. सकाळी सात वाजेपासून सुरू झालेली ही मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू असली तरी येत्या काही तासात मतदानाला वेग येण्याची शक्यता आहे.