मिलिंद देवरांवर धर्माच्या आधारावर मत मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल
काँग्रेस उमेदवार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल
मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस उमेदवार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ एप्रिलला मिलिंद देवरा यांनी जैन समुदायाच्या कार्यक्रमात धर्माच्या आधारे मत मागत तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. यामुळे आचारसंहिता भंग झाल्याने देवरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वकील धरम मिश्रा यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली होती. शिवसेनेने पर्युषण दरम्यान जैन मंदीरांसमोर नॉन वेज बनवून शाकाहारला विरोध केला होता. त्यामुळे जैन समुदायाने त्यांना धडा शिकवायला हवा असे आवाहन मिलिंद देवरा यांनी केले. देवरा यांच्याविरूद्ध इंडीयन पिनल कोर्ट कलम 171, 125 अंतर्गत तक्रार दाखल आली आहे.
मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष देखील आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना हे पद देण्यात आले. संजय निरूपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला. त्यामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी हे मिलिंद देवरा यांचे कौतुक करताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सातत्याने अनिल अंबानी यांच्यावर निशाणा साधत असताना मुकेश अंबानींच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.