Election Result 2019 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील `या` दिग्गज नेत्यांचा पराभव
राज्यात काही ठिकाणी दिग्गज नेत्यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला.
संजय पाटील, झी मीडिया, मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. केंद्रात पुन्हा एकदा भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. केंद्रासोबतच राज्यात देखील काही ठिकाणी दिग्गज नेत्यांचा धक्कादायक रित्या पराभव झाला. राज्यात अनेक वेळा खासदार राहिलेले तसेच २०१४ च्या मोदी लाटेत देखील जे विरोधी उमेदवार जिंकले. त्यांना देखील यंदा पराभवाला सामोरे जावे लागले.
यामध्ये शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते, केंद्रीय राज्यमंत्री हसंराज अहिर, शिवसेना खासदार आंनदराव अडसूळ, चंद्रकात खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या मातब्बर नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
कोण आहेत ते दिग्गज नेते
गीतेंचा तटकरेंकडून पराभव
राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा ३१ हजार ४३८ इतक्या मताधिक्याने पराभव केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीतेंचा अवघ्या २११० मतांनी विजय झाला होता. अनंत गीते हे रत्नागिरी मतदारसंघातून ४ वेळा तर रायगड लोकसभा मतदारसंघातून २ वेळेस खासदार राहिले आहेत.
हंसराज अहिरांचा पराभव
१६ व्या लोकसभेत केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या हसंराज अहीर यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. बाळाभाऊ धानोरकर यांनी हसंराज अहीर यांचा ४४ हजार ७६३ मतांच्या फरकाने पराभव केला. राज्यातून काँग्रेसकडून निवडून आलेले धानोरकर हे एकमेव खासदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे २ खासदार निवडून आले होते.
नवनीत राणांची अडसुळांवर सरशी
विदर्भातील सेनेचा गड समजल्या जाणाऱ्या अमरावती मतदारसंघात शिवसेनेच्या आंनदराव अडसूळ यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी विद्यमान खासदार अडसूळ यांचा ३६ हजार ९५१ मतांनी पराभव केला.
नवनीत राणांना एकूण ५ लाख ७ हजार ८४४ इतके मतदान झाले. तर आनंदरावर अडसूळ यांना ४ लाख ७० हजार ५४९ मते मिळाली. आनंदराव अडसूळ यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना पराभूत केले होते.
औरंगाबादमध्ये शिवसेनेचा गड ढासळला
मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शिवसेनेला पराभव झाला. वचिंत बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी खैरै यांचा ४ हजार ४९२ मतांनी पराभव केला. चंद्रकांत खैरे हे सलग चार वेळा खासदार होते.
शिवाजीराव आढळराव पाटील
शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले. कोल्हे यांनी विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव ५ लाख ८४ हजार ८३ मतांनी पराभव केला. २००४, २००९ आणि २०१४ मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव सलग ३ वेळा खासदार होते. शिवाजीराव यांच्या पराभवामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
दिग्गज सुशीलकुमार शिंदे पराभूत
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदेना पराभवाला सामोरे जावे लागले. सुशीलकुमार शिंदे सोलापूर लोकसभा मतदार संघातून ऊभे होते. भाजपच्या जयसिद्धेश्वर महाराज यांनी शिंदेंचा १ लाख ५८ हजार ६०८ इतक्या फरकाने पराभव केला.
सोलापुरातून प्रकाश आंबेडकर उभे होते. त्यामुळे आंबेडकरांना देखील चांगल्या प्रमाणात मतदान झाले. त्यामुळे शिंदे यांना वंचित आघाडीचा फटका बसला.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा पराभव
काँग्रेसचे विद्यमान प्रदेक्षाध्यक्ष असलेले अशोक चव्हाण यांचा पराभव झाला. नांदेमधून भाजपच्या तिकीटावर प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा ४० हजार १४८ मतांनी पराभूत केले. २०१४ च्या मोदी लाट असताना देखील अशोक चव्हाण नांदेडमधून निवडून आले होते. परंतु यंदा मात्र त्यांना आपली खासदारकी कायम ठेवण्यास अपयश आले.