मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोंदियातल्या सभेत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार हल्लाबोल केला. देशद्रोहाचा कायदाच रद्द करण्याचं षडयंत्र काँग्रेसनं रचल्याचा आरोप मोदींनी केला. त्यामुळे अशा जाहीरनाम्याशी देशाचे संरक्षणमंत्री राहिलेले शरद पवार सहमत आहेत का? असा सवाल मोदींनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सध्या झोप उडाली आहे. कारण त्यांची झोप दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये जमा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला... अर्थातच, यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली तिहार तुरुंगातली ती व्यक्ती कोण? याची जोरदार चर्चा सुरू झाली.


कोण आहे तिहार तुरुंगातील ती व्यक्ती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूस्वीच दीपक तलवार नावाच्या दिल्लीतला एका कुप्रसिद्ध कॉरपोरेट लॉबिस्टचं दुबईतून प्रत्यर्पण झालं. दीपक तलवारावर 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी'साठी राखून ठेवण्यात आलेले ९० कोटी रुपये हडप केल्याचा प्राथमिक आरोप आहे. याच आरोपात तो सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. पण खरी गोम त्याच्या आणि प्रफुल्ल पटेल यांच्या मैत्रीमध्ये आहे. याच मैत्रीचा फायदा घेऊन तलवारनं 'एअर एशिया'ला सरकारी धोरणात स्वतःच्या फायद्यासाठी बदल करण्यास मदत केल्याचा आरोप आहे.


सरकारच्या नियमानुसार परदेशात प्रवासी सेवा देण्यासाठी विमान कंपनीकडे पाच वर्षाचा अनुभव आणि २० विमाने असणे बंधनकारक आहे. तलवारनं या नियमांना फाटा देऊन सरकारी अधिकारऱ्यांना लाच देऊन 'एअर एशिया'ला परदेशात प्रवासी वाहतुकीसाठी परवाना मिळावून दिल्याचा आरोप आहे. नागरी हवाई वाहतुकीच्या वर्तुळात पाश्चिमात्य विमान कंपन्यांच्या फायद्याचे करार घडवून आणण्यात तलवारची मोठी भूमिका असल्याची चर्चा आहे. 


तलवारनं घडवून आलेल्या याच करारांमुळे भारत सरकारची कंपनी 'एअर इंडिया'नं अत्यंत किफायशीर हवाई मार्गांवरच्या फेऱ्या गमावल्याचा आरोप आहे.  तलवारनं घडवून आणलेले सगळे कररार प्रफुल्ल पटेल यांच्या कारकिर्दीत झाले. तलवार आणि पटेल यांची घट्ट मैत्री असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात नेहमीच रंगत असे. दोन वर्षांपूर्वी आयकर विभागनं त्याच्या दिल्लीतल्या घरावर छापा घातला. तब्बल १ हजार कोटी रुपयांचं उत्पन्न लपवल्याचा तलवारवर आरोप आहे. म्हणूनच पटेल यांच्या गडामध्ये घेतलेल्या सभेत मोदींनी नाव न घेता पटेल यांच्यावर निशाणा साधल्याची सध्या चर्चा आहे.