`वंबुआ`मुळे अशोक चव्हाणांना आपल्याच गडात धोका?
यंदा वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसपुढे मोठं आव्हान उभं केलंय. अशोक चव्हाणांसाठी ही धोक्याची घंटा आल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत
सतिश मोहिते, झी २४ तास, नांदेड : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसाठी यंदाची निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे चव्हाणांसाठी ही निवडणूक धोक्याची घंटा ठरत आहे. वंचित बहुजन आघाडीला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागण्याची चिन्हं आहेत.
मोदी लाटेतही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमधून ८० हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. पण, यंदाची निवडणूक चव्हाणांसाठी बिकट असल्याचं दिसतंय. कारण वंचित बहुजन आघाडीमुळे ही निवडणूक तिरंगी झालीय. प्रकाश आंबेडकरांमुळे वंचित बहुजन आघाडीला मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे काँग्रेसची हक्काची दलीत मतं वंचित बहुजन आघाडीकडे वळल्याचं चित्रं आहे... तर दुसरीकडे नांदेडमध्ये सपा-बसपा आघाडीने चांगला उमेदवार दिल्याने मुस्लीम मतंदेखील फुटण्याची शक्यता आहे.
दलित आणि मुस्लिमांची एकगठ्ठा मतं ही काँग्रेसची जमेची बाजू होती. मात्र, यंदा वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसपुढे मोठं आव्हान उभं केलंय. अशोक चव्हाणांसाठी ही धोक्याची घंटा आल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.
आदर्श प्रकरणानंतर राजकीय विजनवासात गेलेल्या अशोक चव्हाणांना २०१४ च्या लोकसभेची उमेदवारी देऊन काँग्रेसनं त्यांचं पुनर्वसन केलं. चव्हाणांना नांदेडकरांनी साथ दिली. पुढे चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले. पण आता राजकीय समीकरणं बदलल्यामुळे अशोक चव्हाण बालेकिल्ला राखण्यात कितपत यशस्वी ठरतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.