`आमच्यावर आईचे संस्कार, पंतप्रधानांवर वैयक्तिक टीका करणार नाही`, पवारांचा पलटवार
पंतप्रधानांना राष्ट्रवादीच्या कौटुंबिक कलहाबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी म्हटलंय
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबाची चिंता करू नये तसंच वैयक्तिक किंवा घराण्यावर आरोप करण्यापेक्षा दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांवर बोला, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मोदींना दिलंय. ते कोल्हापुरात आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि राजू शेट्टींच्या प्रचारार्थ बोलत होते. मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यघटनेत बदल करून एक मताचा अधिकार उदध्वस्त करतील अशी भीती व्यक्त करून पवारांनी गांधी घराण्याच्या त्यागाचं आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. गांधी घराण्याच्या त्यागाची किंमत तुम्हाला कळली नाही तरी ती देशाला माहीत असल्याचं पवारांनी म्हटलंय. आम्हाला आमच्या आईनं योग्य ते संस्कार दिले आहेत त्यामुळे नरेंद्र मोदींनी वैयक्तिक आरोप केले असले तरी मी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक आरोप करणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी पलटवार केलाय.
'मोदी जिथं जात आहेत तिथं खाजगी टीका करत आहेत. परंतु मी मात्र असं करणार नाही कारण मी माझ्या आईनं दिलेल्या संस्कारांनी प्रभावित आहे. वैयक्तिक टीका आमच्या संस्कृतीत बसत नाही' असं म्हणतानाच पंतप्रधानांना राष्ट्रवादीच्या कौटुंबिक कलहाबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील ही पहिलीच प्रचार सभा नुकतीच वर्ध्यात पार पडली. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना 'पराभव समोर दिसत असल्यामुळंच शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली' असा घणाघाती आरोप मोदींनी केला होता.