अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत मराठी मतं युती आणि आघाडीच्या उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहेत. एकुण मतदारांच्या ४६ टक्के हे मराठी मतदार आहेत. त्यामुळे युती आणि आघाडीच्या उमेदवारांनीही या मतदारांकडे फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.  मुंबईत सर्वाधिक चर्चेत असलेला उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील मराठी मत यावेळी निर्णायक ठरणार आहेत. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ राजकारणाच्या बदलत्या घडामोडींमध्ये त्यांच्या हातातून जनता दलाकडे गेला. त्यानंतर मात्र येथील मतदारांनी कधी सेना-भाजप तर, कधी पुन्हा काँग्रेस असा संमिश्र कौल दिलेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


२००९ मध्ये प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या किरीट सोमय्या यांना हरवत राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील २ हजार ९३३ मतांनी निसटता विजय मिळवला. त्यानंतर मात्र मोदी लाटेमध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा पाच लाख मते मिळवून किरीट सोमय्यांनी विजयश्री खेचून आणली. आता सोमय्यांचा पत कट झाल्यानंतर, मनोज कोटक निवडणूकीच्या रिंगणात आहेत.  परंतु यावेळी स्थिती मात्र वेगळी आहे . कारणआघाडी आणि युतीच्या उमेदवारांचे भवितव्य मराठी मतांवर अवलंबून असणार आहे.


मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम या भागात मराठी मतदार अधिक आहेत. ईशान्य मुंबईत सुमारे १५ लाख २७ हजार ५१४ मतदार आहेत. त्यापैकी ७ लाख १ हजार ३१३ हे मराठी मतदार आहेत. त्या खालोखाल २ लाख ३५ हजार ८१७ हे मुस्लीम मतदार आहेत. यापैकी मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा क्षेत्रात १ लाख ५२ हजार २९२ मतदार आहेत. तर,  १ लाख ८१ हजार ४१६ गुजराती मतदारांचा समावेश आहे. मुलुंड आणि घाटकोपर पूर्व परिसरात गुजराती बहुल लोकवस्ती आहे.  २७ हजार ५५१ ख्रिश्चन, तर १ लाख ९९ हजार ७४४ अन्य भाषिकांचा समावेश आहे.



त्यामुळे मराठी मतांना आपलेसे करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने प्रचाराची रणनीती आखली आहे. आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा प्रचार मराठी माणूस म्हणून केला जातोय . परंतु आपण मराठी पुरता मर्यादित न राहता सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करतोय असं हे दोन्ही उमेदवार आवर्जून सांगत आहेत. ईशान्य मुंबईचा आजवरचा इतिहास पाहता लोकसभा निवडणुकांमध्ये कुणाचीच एक हाती सत्ता राहिलेली नाही . त्यामुळे यावेळी मराठी मतदार कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.