दीपक भातुसे, मुंबई : पहिल्या टप्प्याच्या मतदानाला अवघे तीन दिवस राहिले तरी काँग्रेसमध्ये प्रचंड घोळ सुरू आहे. कार्यकर्ते संभ्रमात, नेते भांडणात असताना वरिष्ठ नेते चक्क गायब झाले आहेत. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीतही गोंधळ अशी काँग्रेसची सध्या परिस्थिती आहे. निवडणूक दोन दिवसांवर आली, तरी महाराष्ट्रभर काँग्रेसचा गोंधळ सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी प्रिया दत्त आल्या आणि संजय निरुपमांशी न बोलताच निघून गेल्या. तर उर्मिलाच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेसच्या युवासंमेलनाच्या कार्यक्रमात बँनरवरुन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा गायब होते.


विदर्भातला गोंधळ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ध्यातल्या राहुल गांधींच्या सभेत चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्यासह पुगलिया गटाचा एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिसतच नाहीत. 


मराठवाड्यातला गोंधळ


मराठवाड्यात अब्दुल सत्तारांनी काँग्रेसविरोधात बंडाचं निशाण उभारत युतीला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. 


पश्चिम महाराष्ट्रातला गोंधळ


पुण्याचा उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसनं अभूतपूर्व घोळ घातला. आता एवढा सगळा घोळ सुरू असताना नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहावं, त्यांचाही पुरता घोळ आहे. अशोक चव्हाणांची हतबलता ऑडिओ क्लिपमधून समोर आलीच होती. त्यात विरोधी पक्षनेत्यांचा तर पत्ताच नाही. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील १२ एप्रिलला मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा नगरमध्ये रंगते आहे. विखे यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शालीनताई विखे पाटील भाजपचे नगरमधील उमेदवार सुजय विखे यांचा प्रचार करत आहेत. 


काँग्रेसमधली बेशिस्त, असमन्वय, बंडखोरांना शांत करण्यात अपयश गेल्या काही दिवसांत प्रकर्षानं समोर आलं आहे. गेली ५ वर्षं विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राज्यात निष्प्रभ होतीच. आता निवडणुकीच्या उंबरठ्यावर प्रचंड घोळ काँग्रेसनं घातल्यानं कार्यकर्तेही प्रचंड संभ्रमात आहेत.