पंतप्रधानपदी पुन्हा मोदीच! भेंडवळची भविष्यवाणी
विदर्भासह महाराष्ट्रात भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध आहे.
मयूर निकम, झी २४ तास, बुलढाणा : विदर्भासह महाराष्ट्रात भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध आहे. भेंडवळची भविष्यवाणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण. हे भाकीत ऐकून शेतकरी पुढच्या खरीप आणि रब्बी हंगामाची दिशा ठरवतात. अक्षय्य तृतीयेला घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण करून सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी यावर्षीच्या पीक-पाण्याची भविष्यवाणी जाहीर केली.
भेंडवळची ही भविष्यवाणी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलासा देणारी आहे. देशात निवडणुका सुरू असून पाच टप्प्याचं मतदान पार पडलंय. कुणाची सत्ता येणार याचं उत्तर २३ मे रोजी मिळणार असलं तरी देशातील राजकीय स्थितीवरही भेंडवळने भविष्यवाणी केलीय. देशात स्थिर सरकार राहणार आहे. तर पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच येणार असल्याचं भाकित वर्तवण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसाचं मुख्यमंत्रीपदही कायम राहिल असं अंदाज सांगतोय.
याशिवाय परकीय घुसखोरी होत राहणार, मात्र संरक्षण खाते त्यास चोख प्रत्युत्तर देईल, असे यातून समोर आलंय. कापूस आणि गहू या पिकांचे उत्पादन मोघम स्वरुपात राहणार आणि ज्वारीचे पीक सर्वसाधारण येईल. मात्र भावात तेजी मात्र राहणार नाही, असा अंदाजही यात वर्तवण्यात आलाय.
भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार पहिला महिना जेमतेम पाऊस, दुसरा महिना चांगला तर तिसरा महिना जेमतेम पाऊस राहणार आहे. याचाच अर्थ राज्यावर पुन्हा पुन्हा दुष्काळाचं सावट राहणार आहे. तसंच राज्यात अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलीय. किनारपट्टी भागात आपत्तीचे संकेत भेंडवळच्या भविष्यवाणीत दिलेत. आता भेंडवळचा हा अंदाज कितपत खरा ठरतो हे आगामी काळात स्पष्ट होईल.
काय आहे भेंडवळच्या भविष्यवाणीचा इतिहास?
बुलढाणा जिल्ह्यामध्ये पूर्णा नदीकाठी वसलेल्या भेंडवळमध्ये घटमांडणीची परंपरा आहे. पाऊस पाणी, पिक परिस्थिती, राजकीय आणि आर्थिक स्थिती याविषयीचं भाकीत या घटमांडणीतून सांगितलं जातं. ३००-३५० वर्षांपासूनची ही परंपरा आहे.
आधुनिक काळात हवामान खातं पावसाचे अंदाज वर्तवत असलं तरीही भेंडवळच्या भविष्यवाणीचं महत्त्व कमी झालं नाही. उलट बीबियाणं कंपन्यांचंही या भविष्यवाणीकडे विशेष लक्ष असतं.
अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी शेतामध्ये घटमांडणी केली जाते. त्यामध्ये ७ फूट व्यासाचा घट वापरला जातो. घटाच्या मध्यभागी २ फूट व्यासाचा खड्डा करून त्यामध्ये मातीची ४ ढेकळे ठेवले जातात. ४ ढेकळे पावसाच्या चार महिन्यांचे प्रतीक आहेत. त्यावर पाण्याने भरलेला करवा म्हणजे मातीचे भांडे ठेवले जाते. करव्यावर वडा, भजी, करंजी, पुरी, सांडोळी, कुरडी, पापड, पानविडा, सुपारी मांडली जाते. तर गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडई यासह १८ प्रकारच्या धान्याची आणि खाद्य पदार्थांची प्रतिकात्मक मांडणी केली जाते. घटामध्ये ठेवलेली अंबाडी हे दैवत असते तर मसूर शत्रूचे प्रतीक आणि करडई संरक्षण व्यवस्था मानली जाते.
सुपारी राजाचे, पानविडा राजाच्या गादीचे, पुरी पृथ्वीचे, सांडोळी-कुरडई चारा-पाण्याचे आणि करंजी अर्थव्यवस्थेचे प्रतीक मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे यामध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण करून येत्या वर्षभरातील हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षणव्यवस्था आणि राजकीय घडामोडींबाबत भाकीत वर्तवले जाते.
घटमांडणीनंतर उपस्थित सर्वजण इथून निघून जातात. पहाटे सर्वजण इथे येतात. दुसऱ्यादिवशी सुर्योदयापूर्वी घटात मांडलेल्या वस्तूंचं सुक्ष्म निरिक्षण केलं जातं. त्यानुसार चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज हे भाकीत वर्तवतात.
आजपर्यंत वर्तवण्यात आलेल्या भविष्यवाणीनुसार ७०-७५ % भाकित खरं ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हा केवळ अंदाज असतो यामध्ये कोणतेच वैज्ञानिक आधार नाहीत.
रामचंद्र वाघ यांनी १६५० साली वातावरणातील बदलावरून नक्षत्रांचा अभ्यास करून त्यानुसार पाऊस, पिकांची भविष्यवाणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घटमांडणी सुरू केली. आजही त्यांचे वंशज ही परंपरा पुढे कायम ठेवत आहेत.