या 5 वर्षात महागाई कमी झाली का? अच्छे दिन आले का ?- नारायण राणे
नारायण राणे यांनी भाजप सरकारसह शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचारसभेत चौफेर टीका केली.
मुंबई : 'या 5 वर्षात महागाई कमी झाली का? अच्छे दिन आले का ?' असे म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी भाजप सरकारसह शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचारसभेत चौफेर टीका केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी जाकादेवी येथे जाहीर सभा झाली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी राणे म्हणाले की 5 वर्ष तुम्ही खासदार आहात, सत्तेत आहात मग छातीठोकपणे सांगा एखादा प्रकल्प आणलात, किती लोकांना रोजगार दिलात असा सवाल त्यांनी यावेळी राऊत यांना केला. या 5 वर्षात महागाई कमी झाली का? गॅस, पेट्रोल, डिझेल, कपडे स्वस्त झाले का?महागाई वाढली त्याला जबाबदार कोण हे विनायक राऊतला विचारा अशी सणसणीत टीका त्यांनी केली. साडेतीन कोटी बेकार झाले, 15 लाख अकाउंटवर देऊ शकले नाहीत. 2 कोटी नोकऱ्या दिल्या का? अच्छे दिन येणार सांगितलेत मग कुठे आहेत अच्छे दिन ? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. या सरकारने लोकांना जगणं मुश्किल करून टाकल्याची टीका यावेळी राणेंनी केली. मतदान जसजसे जवळ येत आहे तसे नारायण राणे अधिकच आक्रमक झालेले दिसत आहेत.
नीलेश राणेंवर गुन्हा
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नीलेश राणे निवडणूक लढवत आहेत. शिवीगाळ आणि आरडओरडा करीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हातखंबा एस. एस. टी पॉईंट येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या चेकपोस्टवर गाडीची पोलिसांकडून तपासणी करीत असताना शिवीगाळ करत धमकी दिली. राणे यांनी शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी स्वाभिमानचे सोबत असणाऱ्या १६ जणांवर ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.