नितीन पाटणकर, झी २४ तास, पुणे : 'ऐकतील ते पुणेकर कसले... जगात काहीही होवो...पुणेकर त्यांच्या सवयी सोडणार नाहीत...' असे पुणेकरांबद्दल म्हटले जाते. मग अगदी निवडणूकही त्याला अपवाद नाही. देशभरात हेल्मेट सक्ती असली तरी पुण्यात ती लागू होण्यासाठी सरकारला प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागते.याच वामकुक्षीमुळे मेट्रोचं सर्वेक्षणही रखडलं होतं. तर चितळेंनी दुपारी दुकान उघडं ठेवायचं म्हटल्यावर त्याची मोठ्ठी बातमी झाली होती..असो.. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनाही पुणेकरांच्या सवयीप्रमाणे आपल्या प्रचार फेऱ्या बदलाव्या लागत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दुपारी १ ते ४ प्रचार बंद आहे' असे लिहीलेली पाटी फक्त पुण्यातच पाहायला मिळते. पुण्यामध्ये अशी पाटी पाहायला मिळेल. सध्या राजकीय प्रचार जोरदार सुरू आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या आखत आहेत. जोरदार भाषणं करत आहेत. पण दुपारी वामकुक्षीची वेळ सोडून पाहीजे तितका प्रचार करा असा अलिखित नियम पुण्यात रूजू झाला आहे.


भाजपा उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी वापरली जाणारी जीप देखील दुपारची वामकुक्षी घेताना दिसत आहे. सकाळचा हार, तुरे, पुष्पगुच्छाचा ढीगही तसाच पडून आहे. समोरच असलेल्या भाजपाच्या शहर कार्यालयातही दोन चार कामगार सोडले तर, दुपारी कार्यकर्ता औषधालाही सापडत नाही. पुण्यात उमेदवाराचा प्रचारदौराही सकाळी ९ ते १ आणि दुपारी ४ ते ८ या वेळेत असतो. १ ते ४ वामकुक्षी म्हणजे वामकुक्षीच..याला पर्याय नाही. 


वामकुक्षीच्या बाबतीत भाजपा आणि काँग्रेस एकाच माळेचे मणी आहेत. दुपारी १ ते ४ या काळात काँग्रेस भवनही निवांत पहुडलेलं असतं. दोन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेच्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा एका महाभागानं दुपारी २ वाजता ठेवली. पण पुणेकरांच्या वामकुक्षीमुळे अखेर ही सभा रद्द करावी लागली.