किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : आगामी लोकसभेत सोशल मीडिया भाजपला नकोसा झाला तर विरोधक मात्र सोशल मीडियावर सक्रिय झालेला पाहायला मिळतोय. लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या विजयात आणि मोदींना पंतप्रधान बनविण्यात सोशल मीडियाचा मोलाचा वाटा होता. मात्र तोच सोशल मीडिया न वापरता भाजप प्रचार सभा आणि प्रत्यक्ष भेटींवर भर देत आहेत. तर भाजप विरोधक प्रचार सभांबरोबर भाजपच्या नारे सोशल मीडियावर व्हायरल करत भाजपचा समाचार घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या विजयात आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनविण्यात मोलाचा वाटा उचलणारा सोशल मीडिया २०१९ च्या निवडणुकीत भाजपलाच नकोसा झाला आहे. यापूर्वी दिलेल्या आश्वासनांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जाब विचारण्यांची संख्या वाढू लागल्याने भाजपने सोशल मीडियाऐवजी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला जात आहे. तर विरोधी पक्षांनाही सोशल मीडिया हाताळणींचे तंत्र जमल्याने हा मीडिया आता भाजपवरच उलटला असून माध्यमांपेक्षाही तो जनतेत प्रभावीपणाचे काम करताना दिसून येत आहे.



२०१४ मध्ये दाखवलेल्या स्वप्नांची आठवण सोशल मीडियाच्या माध्यमातून करून दिली जात आहे...त्यामुळे सोशल मीडिया भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळच भाजपकडून आपल्या समर्थकांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला असावा असा अंदाज राजकीय विश्लेषक शैलेंद्र तणपुरे व्यक्त केला आहे. 


स्मार्ट फोन सगळ्यांच्याच हातात आल्याने सोशल मीडिया प्रचारासाठी प्रभावी साधन ठरत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मोबाइल, जीमेल, व्हॉट्सअप,फेसबुक, ट्वीटर या सोशल मीडियाच्या साधनांचा प्रभावीपणे वापर केला होता. निवडणुकांच्या आधीच माध्यमांसह सोशल मीडियाद्वारे काँग्रेसविरोधी वातावरण तयार करण्यात भाजपला यश आले होते. सोशल मीडियातून भाजपने काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा पद्धतशीरपणे प्रचार करत, भाजपने आपल्या भविष्यातील भारताचे स्वप्नही सोशल मीडियावर दाखवले होते.मात्र तीच सर्व यंत्रणा विरोधी पक्षांनी हाती घेतलीय त्यामुळे सोशल मीडिया अलीकडे महत्वाची भूमिका बजावेल अशी शक्यता राजकीय विश्लेषक किरण अग्रवाल यांनी वर्तवली आहे. 



भाजपने सत्तेत येण्यापूर्वी दाखवलेले स्वप्न, १५ लाख रुपयांची घोषणा, भ्रष्टाचार रोखण्यात आलेले अपयश, पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर देण्याचे केलेले आव्हान आता सोशल मीडियात भाजपवरच पलटले आहे.भाजपने विरोधकांवर शस्र म्हणून वापरलेला सोशल मीडियाचे अस्र भाजपवरच बुमरँग झाल्याने आता भाजपचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे. मात्र विरोधक सोशल मीडियावर अधिक सक्रिय असल्याने सोशल मीडिया यंदा कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहेत.