मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या होत आहे. चौथ्या टप्पा हा राज्यातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि मतदानाचा अखेरचा टप्पा असेल. त्यानंतर राज्यातलं ४८ मतदारसंघातलं मतदान पूर्ण होणार आहे. चौथ्या टप्प्यात राज्यात एकूण १७ मतदारसंघात मतदान होणार आहे. तर देशात ९ राज्यातल्या ७१ मतदारसंघात मतदान होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, मिलिंद देवरा तसेच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं भवितव्य उद्या मतदान यंत्रात बंद होणार आहे. राज्यात तब्बल ३.११ कोटी मतदार मतदान करणार आहेत. राज्यात उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, मुंबईतले सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, भिवंडी, कल्याण, पालघर, तर पश्चिम महाराष्ट्रातले मावळ, शिरूर, शिर्डी या मतदारसंघात मतदान होणार आहे. उत्तर मुंबईतल्या गोपाळ शेट्टी विरूद्ध उर्मिला मातोंडकर ही लढत लक्षवेधी असणार आहे. दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा विरूद्ध अरविंद सावंत अशी जोरदार लढत आहे. शिरूर मतदारसंघात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे विरूद्ध शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळ मतदारसंघातली पार्थ पवार विरूद्ध श्रीरंग बारणे अशी लढतही लक्षवेधी असेल. 



मध्य प्रदेशात उद्या चौथ्या टप्प्यापासून मतदानाला सुरूवात होत आहे. मध्य प्रदेशात भाजप विरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. मध्य प्रदेशात २९ मतदारसंघ आहेत. त्यापैकी सिद्धी, शाहडोल, जबलपूर, मंडला, बालाघाट, छिंदवाडा या सहा मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. मध्यप्रदेशात पाचव्या टप्प्यासाठी प्रचार चांगलाच रंगात आलाय. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे संपूर्ण राज्य पिंजून काढत आहेत. गुना या आपल्या परंपरागत मतदारसंघात सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिलाय. मतदारसंघात आदिवासी भागाचा दौरा करताना ढोल वाजवण्याचा मोह त्यांना आवरला नाही. ज्योतिरादित्य यांनी डोक्याला पटका गुंडाळून ढोलवादन केलं.